नाशिक : १५ वर्षीय मुलाला कोव्हॅक्सिनऐवजी दिली कोविशील्ड लस ! | पुढारी

नाशिक : १५ वर्षीय मुलाला कोव्हॅक्सिनऐवजी दिली कोविशील्ड लस !

येवला, पुढारी वृत्तसेवा

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील पाटोदा येथे आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ कारभारामुळे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. यात १५ ते १८ वर्ष वयोगटातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणात १५ वर्षाच्या एका मुलाला कोव्हॅक्सिनऐवजी कोविशील्ड लस दिली आहे.

नाशिक जिल्ह्यात सोमवारपासून १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांचे कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले. येवला तालुक्यातील पाटोदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी विद्यार्थ्याला कोव्हॅक्सीनऐवजी चक्क कोविशील्ड लस देण्यात आली. त्यामुळे पालक संतप्त झाले असून, प्रशासनाची पाचावर धारण बसली आहे. सदर विद्यार्थी हा राष्ट्रवादीचे वसंत पवार व येवला पंचायत समितीच्या माजी सभापती शिवांगी पवार यांचा मुलगा आहे.

गेल्या पावणेदोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शाळा आणि कॉलेज बंद होते. आता कुठे तरी शाळा कॉलेज सुरू झाले असून, त्यात आता कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन या नवीन प्रकाराने रुग्ण संख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकार आता दक्ष झाले आहेत. कोरोना विषाणूचे संक्रमण वाढू नये म्हणून आजपासून सर्वत्र १५ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांचे लसीकरण सुरू केले आहे. शासनाने या वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिन ही लस देण्याचे सांगितले आहे. मात्र, येवला तालुक्यातील पाटोदा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये १६ वर्षे वयाच्या अथर्व पवार यास कोव्हॅक्सिनऐवजी कोविशील्ड लस दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

तालुक्यातील आरोग्य विभागाच्या या भोंगळ कारभाराने पालक धास्तावले आहेत. याप्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी करण्याची मागणी अथर्वचे वडील अध्यक्ष वसंत पवार यांनी केली आहे. दुसरीकडे आरोग्य केंद्रांमध्ये असलेल्या आरोग्य सेविकेने चुकून हा प्रकार केल्याची कबुली तालुका आरोग्य अधिकारी हर्षल नेहते यांनी दिली आहे. मात्र, संबंधितांवर काय कारवाई करणार याबाबत त्यांनी मौन बाळगले आहे. सध्या लसीकरण झालेल्या अथर्वची तब्येत व्यवस्थित आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button