नंदुरबार : खंडणी मागितल्याप्रकरणी नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल | पुढारी

नंदुरबार : खंडणी मागितल्याप्रकरणी नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा : साईराज सरकार ट्रॅव्हल्सच्या बसमधून बेकायदेशीर प्रवाशी वाहतूक करतात म्हणून ट्रॅव्हल्स मालकाला धमकावून मारहाण करीत खंडणी मागितल्याचा आरोप नवापूर येथील एका नगरसेवकावर करण्यात आला आहे. याप्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात एक नगरसेवक व १० ते ११ अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशपाक खान युसुफ खान (वय ३६, रा- कासोदा, ता. एरंडोल, जि. जळगाव) या चालकाने नवापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे. यात त्याने दि. १९/१२/२०२१ रोजी रात्री १ ते ३ वाजण्याच्या सुमारास चालक अशपाक हा सुरत येथून जळगावकडे साईराज सरकार ट्रॅव्हल्स बस (क्र.GJ ११ X ०६८८ ) घेऊन निघाला होता. त्यावेळी बसमध्ये २८ प्रवासी होते.

नवापूर शहाराजवळचा रेल्वे गेट बंद असल्याने चालकाने ट्रॅव्हल्स तेथे थांबवली. याचदरम्यान १० ते १२ अनोळखी व्यक्ती मोटरसायकलवरून तेथे आले. त्यांनी मोटरसायकली बसच्या पुढे आडव्या लावत बस बेकायदेशीर चालू आहे, पुढे जावू देणार नाही, पुढे जाण्यासाठी हप्ता लागेल असे सांगत खंडणीची मागणी करू लागले.

यानंतर चालकाने ट्रॅव्हल्सचा मालक शाहरुक खाटीक ( रा. नवापूर ) यांना सदर ठिकाणी बोलावून घेतले. ट्रॅव्हल्स मालकाने तेथे येऊन विचारणा केली असता नगरसेवक असलेल्या व्यक्तीने त्याच्याकडेही खंडणीची मागणी केली.

यानंतर शाहरुक खाटीक याने गावाकडची गाडी आहे, कशाला त्रास देता असे म्हणताच नगरसेवकाने त्याच्या पोटावर चाकू लावला व एका अनोळखी व्यक्तीने शाहरुकच्या खिशातील ५ हजार रुपये काढून घेतले. याच दरम्यान दुसऱ्या एकाने शाहरुकसोबतच्या मित्राला लोखंडी पाईप मारण्याचा प्रयत्न केला. तर अन्य व्यक्तींनी लोखंडी सळईने बसच्या काचा फोडत हाताबुक्यांनी मारहाण केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ हे अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button