दाेन लाख रुपयांच्या लाचप्रकरणी जि.प. शिक्षण विभागातील लिपिकाला अटक | पुढारी

दाेन लाख रुपयांच्या लाचप्रकरणी जि.प. शिक्षण विभागातील लिपिकाला अटक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

येथील आर.आर.विद्यालयात विनाअनुदानित तत्वावरून अनुदानित शिक्षण सेवक पदावर नियुक्तीच्या मान्यतेसाठी तब्बल २लाख,३० हजार रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपिक योगेश खोडपे याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी खोडपे याला अटक करण्यात आली आहे.

जळगाव येथील आर.आर.माध्यमिक विद्यालयात तक्रारदार यांचे भाऊ शिक्षणसेवक म्हणून सन २०१४ पासून कार्यरत आहेत. त्यास अनुदानित तत्वावर शिक्षणसेवक पदावर नियुक्तीच्या मान्यतेसाठी जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षण विभागात कार्यरत वरिष्ठ लिपिक योगेश अशोक खोडपे, (रा.ममता राणे नगर,वाघनगर जळगाव,) याच्याकडून १२ फेब्रुवारी २०२१ रोजी २ लाख ३० हजार रूपयांची मागणी करण्यात आली.

तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार नाशिक परिक्षेत्राचे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनानुसार जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या पथकाकडून अधिक पडताळणी करण्यात आली. सापळा लावण्यात आला. खोडपे याने तक्रारदाराकडे २ लाख ३० हजार रूपयांच्या लाचेची मागणी पंचासमक्ष केल्याचे सिद्ध झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिकार्‍यांकडून लाचेची मागणी केल्याप्रकरणी खोडपे याच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली.

ही कारवाई जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक तथा पर्यवेक्षण अधिकारी शशिकांत पाटील यांच्‍यासह पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, स.फौ. सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, सुनील पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, जनार्दन चौधरी, प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदीप पोळ यांच्या पथकाने केली.

हेही वाचा

 

Back to top button