Nashik Farmes : अवकाळी पावसाचा द्राक्ष बागांसह कांदा पिकाला फटका - पुढारी

Nashik Farmes : अवकाळी पावसाचा द्राक्ष बागांसह कांदा पिकाला फटका

नाशिक-लासलगाव-चांदवड-उगांव (ता. निफाड); पुढारी वृत्तसेवा

अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका साखर उतरलेल्या द्राक्ष बागांना बसला आहे. दोन दिवसांपासून आलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांना तडे गेल्याने तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी पूर्णतः उद्धवस्त झाला आहे. तसेच लाल कांद्याचे देखील नुकसान झाल्याने कांद्याचे उत्पादन घटून भावात तेजी पहावयास मिळणार आहे. त्याचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना फायदा न होता व्यापाऱ्यांना होणार आहे. अवकाळीमुळे नुकसान झालेल्या द्राक्ष, कांदा पिकांचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करीत आहे. (Nashik Farmers)

चांदवड; पुढारी वृत्तसेवा – चांदवड तालुक्यात बुधवारी सकाळपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाने साखर उतरलेल्या द्राक्ष बागांना दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी तडे गेल्याचे दिसून आले. जवळपास निम्म्या पेक्षा अधिक द्राक्ष बागांना तडे गेले असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष पीक घेण्यासाठी शेतकरी लहान मुलाप्रमाणे द्राक्ष बागांची जडणघडण करीत असतात, आज द्राक्ष बागा चांगल्या बहरल्याने द्राक्षाचे उत्पादन चांगले होईल अशी आशा बळीराजाला होती. मात्र दोन दिवसांपूर्वी हवेच्या झोक्यावर डोळणारे द्राक्षांच्या बागांना निसर्गाची दृष्ट लागली अन् अवकाळी पावसामुळे होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

द्राक्ष पिकांसह भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान

लासलगाव; पुढारी वृत्तसेवा – लासलगाव व परिसरात पडलेल्या पावसामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले झाले आहे. शहरातील बहुतांश तालुक्यात सकाळी आठ वाजलेपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे कांदा, द्राक्ष पिकांसह भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले. निफाड तालुक्यातील ब्राह्मणगाव विंचूर येथील रमेश विठ्ठल गायकवाड यांचे दोन एकर सोनाका फ्लॉवरिंग स्टेजमध्ये असताना गेल्या २४ तासाहून अधिक झालेल्या अवकाळीने यांचे ८५ टक्के द्राक्ष बागेचे नुकसान झाले आहे. त्याचबरोर भास्कर दत्तात्रय गवळी व रामभाऊ गवळी यांच्या द्राक्ष बागेत पूर्ण पाणी साचले आहे. यामुळे द्राक्षपिकाला सर्वाधिक तडाखा बसला. (Nashik Farmers)

द्राक्षघडांत पाणी साचून घडकूज

अवकाळी पावसाने फुटव्यात असलेल्या द्राक्षबागांसह फुलोऱ्यात व काढणीला आलेल्या द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. दुसरीकडे, हातातोंडाशी आलेला घास वाया जाऊ नये म्हणून द्राक्षबागांवर औषध फवारणी करावी लागतेय. त्यामुळे खर्च वाढल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे ५० टक्केहुन अधिक द्राक्षबागांवर डाऊनी व भुरी रोगाचा प्रादूर्भाव होऊन नुकसान होण्याची भीती वाढली आहे. याशिवाय कांदा, टोमॅटो, मका व भाजीपाला यास पावसाने तडाखा दिलाय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. (Nashik Farmers)

उगांव (ता. निफाड) : पुढारी वृत्तसेवा – निसर्गाच्या लहरीपणाचा सामना द्राक्ष उत्पादकांना करावा लागत आहे. गडद ढगाळ हवामान अन त्यानंतर सुरु झालेला संततधार पाऊस यामुळे फुलोरा अवस्थेतील द्राक्षमालाची गळती झाली आहे. तर द्राक्षघडांत पाणी साचून घडकूज होत आहे. त्यामुळे सरासरी तीस टक्के द्राक्षमालाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

द्राक्ष बागायतदारांची सकाळपासून रोगप्रतिकारक औषधांची फवारणीसाठी लगबग दिसत होती. स्पर्शजन्य औषधांची फवारणी करुन बुरशीच्या रोगांचा प्रतिकार करण्याचे द्राक्षबागायतदारांचे प्रयत्न आहेत. मात्र द्राक्षबागांत पाणी साचून राहिल्याने ट्रॅक्टर चालविणेही मुश्किल झाले आहे. अद्यापही गडद ढगाळ हवामान असुन द्राक्षबागांतून साचलेले पाणी काढुन देण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग दिसत होती.

संततधार पाऊसामुळे द्राक्षमालाचे नुकसान झाले आहे. रोगप्रतिकारक औषधांच्या फवारणीचा खर्च एकरी सुमारे पंधरा वीस हजार रुपये वाढला आहे. द्राक्षबागांच्या नुकसानीचे पंचनामे करावे व उत्पादकांना भरपाई द्यावी

– कैलासराव भोसले, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ

हेही वाचा :

Back to top button