जळगाव : ग्रामसेविकेला जिल्हाधिकार्‍यांनी सुनावली एक महिन्याची न्यायालयीन कोठडी | पुढारी

जळगाव : ग्रामसेविकेला जिल्हाधिकार्‍यांनी सुनावली एक महिन्याची न्यायालयीन कोठडी

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : ग्रामसेविका प्रियंका अशोक बाविस्कर यांना एक महिने न्यायालयीन कोठडीत टाकण्याचे आदेश दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या ग्रामसेविका भुसावळ तालुक्यातील किन्ही येथील ग्रामपंचायतीचे दप्तर ताब्यात देत नव्हत्या.
याबाबत सविस्तर असे की, भुसावळ तालुक्यातील किन्ही येथून बदली होऊनही आपल्या ताब्यातील दप्तर त्या नियुक्त ग्रामसेवकास हस्तांतरित करत नव्हत्या. यामुळे किन्ही येथील तत्कालीन ग्रामसेविका प्रियंका अशोक बाविस्कर यांच्यावर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कठोर कारवाई केली आहे.

तत्कालीन ग्रामसेविका बाविस्कर यांनी चुंचाळेला (ता. यावल) बदली होऊनही त्यांच्या कार्यकाळातील ग्रामनिधी, पाणीपुरवठा स्वच्छ भारत मिशन, रोजगार हमी, १४वा वित्त आयोग, दलित वस्ती योजनेची कीर्द आणि कोणतेही दप्तर देण्याचे बाविस्कर यांनी टाळले होते. याबाबत जिल्हा परिषद सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे यांनी पाठपुरावा केला होता. यावर जिल्हाधिकारी यांच्याकडे दोन महिन्यांपूर्वी सुनावणी झाली होती. यात १० दिवसांच्या आत दप्तर ताब्यात देण्याचा लेखी आदेश जिल्हाधिकारी राऊत यांनी ४ नोव्हेंबरला दिला होता. तरी दप्तर न दिल्याने ग्रामसेवकांच्या तक्रारीवरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

प्रियंका बाविस्कर यांना वारंवार सूचना देऊनही दप्तर न दिल्याने या ग्रामसेविकेला दप्तर परत देईपर्यंत किमान ३० दिवस न्यायालयीन कोठडीत टाकण्याचे निर्देश दिले आहे. यासंबंधीचे पत्र यावल पोलिस निरीक्षकासह जिल्हा तुरुंग अधीक्षकांना दिले आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : Travel Vlog | वीकेंडला फिरता येईल असं कोल्हापूरपासून जवळच ठिकाण

Back to top button