धुळे, जळगावमध्ये एस.टी.वर दगडफेक | पुढारी

धुळे, जळगावमध्ये एस.टी.वर दगडफेक

धुळे/जळगाव : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील धुळे, जळगाव आणि पैठणनजीक रविवारी एस.टी. बसेसवर दगडफेकीच्या काही घटना घडल्या. एस.टी. कर्मचार्‍यांचा संप सुरू असताना, महामंडळाने प्रतीक्षा यादीतील कर्मचार्‍यांना बोलावून एस.टी. बसेस सुरू केल्यानंतर या घटना घडल्या.
रविवारी धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी बसेसवर दगडफेक करण्यात आली.

धुळे आगारातून पोलिस बंदोबस्तात बससेवा सुरू करण्यात आली. त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. संपकरी कर्मचार्‍यांनीही गांधीगिरी करीत आंदोलन केले. तरी काही बसेस शिंदखेडा तालुक्यातील गावांना रवाना केल्या. त्यापैकी एक बस नरडाणा येथून परतत असताना, धुळे शहरालगतच्या नगावबारीजवळ अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. त्यात बसची काच फुटून चालक विजय भामरे जखमी झाले.

जळगाव जिल्ह्यातही महामंडळाने काही बसेस सुरू केल्या. त्यापैकी चोपड्याला जाणार्‍या बसवर (एम.एच. 20 बीएल 3361) ममुराबादजवळ अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली

पैठणकडे येणार्‍या बसवर दगडफेक; गुन्हा दाखल
पैठण ः शनिवारी शहरातून पाचोडकडे पोलिस बंदोबस्तात बस सोडण्यात आली होती. ही बस पैठणकडे परतत असताना तिच्यावर पाचोड फाट्यावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना घडली. दरम्यान, याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आजच्या सुनावणीकडे लक्ष

एस.टी. कर्मचार्‍यांच्या संपाबाबत महामंडळाने दाखल केलेल्या अवमान याचिकेवर सोमवारी उच्च न्यायालयात कोणता निर्णय होतो, याकडे एस.टी. महामंडळ आणि कर्मचार्‍यांचे लक्ष लागले आहे.

Back to top button