कोल्हापूर : कुख्यात भास्कर टोळीतील म्होरक्या अमोल भास्करसह पाचजण जेरबंद | पुढारी

कोल्हापूर : कुख्यात भास्कर टोळीतील म्होरक्या अमोल भास्करसह पाचजण जेरबंद

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक बांधकाम खात्यातील निवृत्त कर्मचार्‍याला ठार मारण्याची धमकी देऊन जवाहरनगर येथील मध्यवर्ती परिसरातील चार गुंठ्यांचा प्लॉट बळकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कुख्यात भास्कर टोळी तील म्होरक्या अमोल महादेव भास्करसह पाचजणांना राजारामपुरी पोलिसांनी रविवारी पहाटे जेरबंद केले. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

अमोल भास्कर (वय 37), महादेव शामराव भास्कर (62), अमित ऊर्फ पिंटू महादेव भास्कर (32), शंकर शामराव भास्कर (53), संकेत सुदेश व्हटकर (22, सर्व रा. जवाहरनगर, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी संशयितांच्या घरांची झडती घेऊन सर्वांना अटक केली.

दिवाळीच्या तोंडावर कुख्यात भास्कर टोळी तील साथीदारांविरुद्ध खंडणीप्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात त्यांना अटकपूर्व जामीन झाला होता. पाठोपाठ आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने या टोळीविरुद्ध ‘मोकां’तर्गत कारवाईसाठी वरिष्ठस्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत.

सार्वजनिक बांधकाम खात्यातील निवृत्त कर्मचार्‍याने 1999 मध्ये भविष्यात कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी सि.स.नं. 2892 क. बी वॉर्ड, जवाहरनगर परिसरात प्राईम लोकेशनला 369.37 चौरस मीटरची जागा खरेदी केली आहे. सध्याच्या बाजारभावानुसार 80 ते 90 लाखांची किंमत असलेल्या प्लॉटवर संरक्षक कंपाऊंड उभारले असून, प्रवेशद्वाराला कुलूप लावले आहे.

प्लॉटची देखभाल करण्यासाठी फिर्यादी शनिवारी गेले असता, अमोल भास्करसह कुटुंबातील अन्य संशयितांनी त्यांना गाठले. ‘तुला आधीच सांगितले आहे की, ही प्रॉपर्टी आम्हाला पाहिजे आणि तू इथं थांबायचं नाही. आम्हाला पाहिजे ती प्रापर्टी घेतल्याशिवाय राहत नाही. आजच्या आज ही जागा आमच्या नावावर करावी लागेल, तुला तुझा जीव प्यारा असेल, तर त्या स्टॅम्प पेपरवर सही करायची अन् इथून फुटायचं…’ अशा शब्दांत धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

टोळीविरुद्ध धाडसाने पुढे या! पोलिस अधिकार्‍यांचे आवाहन

भास्कर टोळीतील सराईतांनी अशाप्रकारे खंडणी वसुली, जीवे मारण्याची धमकी अथवा कोणावर बेकायदा सावकारी करून मालमत्तांवर कब्जा केलेला असल्यास संबंधितांनी राजारामपुरी पोलिस ठाण्याशी तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहनही पोलिस निरीक्षक ओमासे यांनी केले आहे.

संशयितांच्या घरांची झडती

भास्कर टोळीच्या म्होरक्याने ठार मारण्याची धमकी दिल्याने भेदरलेल्या वृद्धाने राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक ईश्वर ओमासे यांची भेट घेऊन कैफियत मांडली. अमोल भास्करसह वडील, भावासह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पहाटे संशयितांच्या घरांची झडती घेऊन ताब्यात घेण्यात आल्याचे ओमासे यांनी सांगितले.

Back to top button