

पेठवडगाव ; संजय दबडे : कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीवरून येथील नगरपालिकेचे राजकारण तापले आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सत्ताधारी युवक क्रांती महाआघाडीला वेळोवेळी पुरवलेली रसद तर पालकमंत्री सतेज पाटील यांनी विकासकामासाठी दिलेला कोट्यवधी रुपयांचा निधी यामुळे महाआघाडी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी केलेल्या उपकाराची परतफेड करायची की पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलेल्या मदतीला जागायचे, अशा कात्रीत सापडली आहे.
माजी नगराध्यक्ष स्व.विजयसिंह यादव यांच्या विरोधात युवक क्रांती आघाडीचे नेते स्व. शिवाजीराव सालपे यांना महादेवराव महाडिक यांनी नेहमीच रसद पुरवली होती. सालपे यांनी यादव यांच्या सत्तेला हादरा दिला होता. परिणामी महादेवराव महाडिक आणि स्व. विजयसिंह यादव घराण्यात कायमचे शत्रुत्व निर्माण झाले होते. 1999 साली विधान परिषेदच्या निवडणुकीत माजी आमदार महाडिक यांच्या विरोधात स्व. विजयसिंह यादव यांनी स्वत: दंड थोपटून तगडे आव्हान दिले होते.
जिल्ह्याच्या राजकारणाची हवा बदलत गेली त्याप्रमाणे युवक क्रांती आघाडी कात टाकत गेली. प्राप्त परिस्थितीनुसार काँग्रेस, जनसुराज्य, राष्ट्रवादी पक्षाशी घरोबा केला. दरम्यान, येथील यादव आघाडीबरोबर कायम असलेल्या पालकमंत्री सतेज पाटील यांनी सत्ताधारी महाआघाडीशीही जवळीक साधली. विकासकामाच्या निमित्ताने कोट्यवधी रुपयांचा निधी देऊन पालकमंत्री पाटील यांनी महाआघाडीला सोबत घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता महाआघाडी राजकीय पेचात सापडल्याचे दिसत आहे.
2006 साली विधान परिषदेची निवडणूक झाली. या निवडणुकीत महाडिक यांच्या बाजूने स्व. शिवाजीराव सालपे यांची महत्त्वाची भूमिका होती. मात्र मतांच्या साठमारीत नगरसेवकांच्या बदलत्या धोरणामुळे स्व. सालपे यांच्या अस्तित्वाला धक्का बसला होता. 2006 मध्ये विचित्र घडामोडींचा 15 वर्षांनंतर मागोवा वडगाववासीयांत रंगला आहे.
शिरोळ ; पुढारी वृत्तसेवा : विधान परिषदेचे उमेदवार ना. सतेज पाटील यांनी रविवारी शिरोळ, जयसिंगपूर येथील यड्रावकर गटाच्या नगरसेवक मतदारांची भेट घेतली. यावेळी मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण गट व मतदार सतेज पाटील यांच्या पाठीशी ठाम राहणार असल्याचे आश्वासन उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांनी दिले.
ना. यड्रावकर गटाची भूमिका महाविकास आघाडीच्या उमेदवार ना. सतेज पाटील यांना पाठबळ देणारी आहे. या निवडणुकीमध्ये ना. पाटील यांचा विजय निश्चित असल्याचे संजय यड्रावकर यांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, मदन कारंडे यांनी मनोगत व्यक्त केले. भेटी दरम्यान मा. नगराध्यक्षा स्वरूपाताई पाटील -यड्रावकर, सभापती दीपाली परीट, जि.प. सदस्या परविन पटेल यांच्यासह शिरोळ, इचलकरंजी, जयसिंगपूर नगर परिषदेचे नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होत्या.
विजयाच्या गणितासाठी जुळवलेल्या आकडेवारीला धक्का लागू नये, यासाठी उमेदवारांनी मतदारांना सहलीला जाण्यासाठी तगादा लावला आहे. मतदारांचे मात्र दराकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
यापूर्वी प्रथम मतदारांना सहलीवर पाठविले जाते. त्यानंतर त्यांच्याशी उमेदवार अर्थपूर्ण बोलणी करत असतात. परंतु यावेळी उमेदवारांनी सहलीचे नियोजन केले असताना देखील मतदार सहलीस जाण्यास तयार नसल्याचे दिसते. सहलीवर पाठविल्यानंतर मतदारांचा विरोधी उमेदवाराशी संपर्क देखील होऊ शकत नाही. याशिवाय या निवडणुकीत कोणत्या उमेदवाराने किती मतदारांना सहलीवर पाठविले, यावर या निवडणुकीत निकालाचा अंदाज येत असतो. त्यामुळे मतदारांना सहलीवर पाठविण्यासाठी उमेदवाराची घाई सुरू असते.
कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीमध्ये पाटील व महाडिक यांची लढत निश्चित झाल्यानंतर मतदारांना 'टोकन' देण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवार मतदारांना सहलीवर पाठविण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत. परंतु अद्याप अर्थपूर्ण बोलणी पूर्ण न झाल्यामुळे मतदार राजा सहलीसाठी तयार नाही. येत्या दोन दिवसांमध्ये टोकननंतरची रक्कम निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच मतदार सहलीला रवाना होण्याची शक्यता आहे.