नाशिकच्या रस्त्यांची आता यांत्रिकी झाडूंद्वारे होणार स्वच्छता

नाशिकच्या रस्त्यांची आता यांत्रिकी झाडूंद्वारे होणार स्वच्छता
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात आता यांत्रिकी झाडूद्वारे रस्ते स्वच्छता केली जाणार आहे. सफाई कर्मचारी संघटनांचा विरोध डावलून तत्कालीन भाजप सत्ताधाऱ्यांनी खरेदी केलेले ३३ कोटींचे चार यांत्रिकी झाडू सप्टेंबरअखेर नाशिकमध्ये दाखल होत आहेत. एका यांत्रिकी झाडूच्या माध्यमातून दररोज ४० किलोमीटर याप्रमाणे चार यंत्रांच्या माध्यमातून दररोज १६० किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ केले जाणार आहेत. या यांत्रिकी झाडूंचे संचलन संबंधित मक्तेदार कंपनीमार्फतच केले जाणार असून, संकलित झालेला कचरा खतप्रकल्पावर वाहून नेला जाणार आहे.

केंद्राच्या स्वच्छ शहर स्पर्धेत नाशिकची कामगिरी उजळविण्याच्या नावाखाली तत्कालीन भाजप पदाधिकाऱ्यांनी यांत्रिकी झाडू खरेदीचा निर्णय घेतला होता. त्यासाठी यांत्रिकी झाडूच्या माध्यमातून रस्ते स्वच्छता करणाऱ्या आणि स्वच्छ शहर स्पर्धेत सलग दोन वर्षे देशात प्रथम आलेल्या इंदूरची वारीदेखील निश्चित करण्यात आली होती. मात्र कोरोनामुळे हा दौरा रद्द करावा लागला होता. महापालिकेच्या या यांत्रिकी झाडू खरेदीला सफाई कर्मचारी संघटनांनी कडाडून विरोध दर्शविला होता. महापालिकेचे १८००हून अधिक नियमित सफाई कर्मचारी आहेत. कंत्राटी तत्त्वावर ७०० सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. असे असताना यांत्रिकी झाडू कशासाठी हवेत, असा सवाल सफाई कर्मचारी संघटनांकडून उपस्थित केला गेला होता. मात्र, केंद्र शासनाच्या 15व्या वित्त आयोगाच्या निधीमधून हवेची गुणवत्ता सुधारणेसाठी प्राप्त झालेल्या ४१ कोटींच्या निधीचे कारण देत यांत्रिक झाडू खरेदी तसेच पुढील पाच वर्षांसाठी त्याची देखभाल-दुरुस्ती व संचलनासाठी ३३ कोटी रुपयांच्या प्रस्तावावर तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी मंजुरीची मोहोर उमटवली होती. मात्र यांत्रिकी झाडूच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे तसेच निविदा प्रक्रियेवर संशय व्यक्त झाल्यामुळे कार्यारंभ आदेश देण्यामध्ये विलंब झाला. एप्रिल २०२३ मध्ये कार्यादेश दिल्यानंतर सहा महिन्यांमध्ये झाडू पुरवण्याचे बंधन होते. ती मुदत ऑक्टोबर महिन्यात संपुष्टात येणार असून, यांत्रिकी विभागाने अहमदाबाद येथील ओम स्वच्छता कॉर्पोरेशन या ठेकेदाराशी संपर्क केल्यानंतर त्यांनी सप्टेंबर अखेरपर्यंत चारही यांत्रिकी झाडू उपलब्ध होतील, असे सांगितले आहे.

यांत्रिकी झाडूच्या देखभालीवर दुप्पट खर्च

यांत्रिकी झाडूची किंमत प्रत्येकी २ कोटी ६ लाख याप्रमाणे चार यांत्रिकी झाडू खरेदीसाठी १२.३६ कोटी रुपये खर्च होणार आहेत. मात्र या यंत्रांच्या देखभाल-दुरुस्ती व संचलनावर यंत्राच्या किमतीपेक्षा दुपट्ट खर्च होणार आहे. पुढील पाच वर्षांच्या कालावधीत ऑपरेशन, देखभाल दुरुस्ती, इंधन, मनुष्यबळ पुरवणे यासाठी दरमहा ५ लाख ८५ हजार ७०० रुपये इतका खर्च येणार आहे. पाच वर्षांसाठी २१ कोटी ८ लाख रुपये इतका खर्च यांत्रिकी झाडूंवर होणार असल्यामुळे 'घोड्यापेक्षा नाल महाग' असा प्रकार आहे.

नाशकात सप्टेंबरअखेर इटली येथून चार यांत्रिकी झाडू उपलब्ध होणार आहेत. साडेतीन मीटर रुंद रस्त्यावर एका झाडूमार्फत ४० किमी याप्रमाणे रोज १६० किमी रस्त्याची सफाई करून संकलित कचरा खतप्रकल्पावर वाहून नेला जाणार आहे.

– बाजीराव माळी, कार्यकारी अभियंता (यांत्रिकी), मनपा.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news