…अखेर वाहनचालकांना दिलासा; जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील दुहेरी वाहतूक सुरू | पुढारी

...अखेर वाहनचालकांना दिलासा; जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील दुहेरी वाहतूक सुरू

पुणे : जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडी चौक ते खडकी रेल्वे स्थानक यादरम्यानची वाहतूक कोंडी अखेर फुटली. या रस्त्यावरून वाहनचालकांना आजपासून लहान वाहनांसह पुण्याच्या दिशेने जाता येऊ लागले. त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मेट्रोच्या कामामुळे या रस्त्यावरील वाहतूक एकेरी करण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेने रस्तारुंदीकरणाचे काम हाती घेतल्याने एकेरी वाहतूक कायम ठेवण्यात आली होती.

हॅरिस पुलावरून पुण्याकडे येणारी वाहने खडकी बाजाराकडे वळून मुळा रस्त्याने पुण्याकडे येत होती. रोज सुमारे एक लाख वाहने येत असल्याने तेथे अरुंद रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होत असे. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत स्थानिक आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी महापालिका व पोलिस अधिकारी यांच्यासोबत सातत्याने बैठका घेतल्या. गणेशोत्सवापूर्वी किमान लहान वाहनांसाठी दुहेरी वाहतूक सुरू करण्याची मागणी त्यांनी लावून धरली. त्यानुसार हलक्या आणि दुचाकी वाहनांसाठी शुक्रवारपासून (दि. 1) हा मार्ग पूर्ववत खुला करण्यात आला आहे.

शिरोळे म्हणाले की, या अडचणीला स्थानिक नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत होते. त्यामुळे मी येथे वारंवार भेट दिली. स्थानिक लोकांशी, प्रशासनाशी संपर्क करीत लवकर काम पूर्ण करण्याकडे लक्ष दिले. बोपोडीतील प्रलंबित 60 मालमत्तांचे भूसंपादन करून रस्तारुंदीकरणाच्या कामाला वेग देण्यात आला. आणखी दोनशे मीटरचे काम झाल्यानंतर दुचाकी वाहनचालकांना या मार्गावरून थेट पुण्याकडे जाता येईल.

संरक्षण विभागाकडे पाठपुरावा करून सुमारे दहा एकर जागा रस्तारुंदीकरणासाठी मिळविण्यात आली. रस्तारुंदीकरणानंतर येथील रस्ता 42 फूट रुंदीचा होईल. वाहतुकीची समस्या कायमची सुटेल तसेच वाहतुकीला वेग येईल. मेट्रो आणि बीआरटी ही सार्वजनिक वाहतूक सेवाही या रस्त्यावर सुरू राहणार असल्याने त्याचा फायदा सर्वसामान्यांना होईल.

– सिद्धार्थ शिरोळे, आमदार

Back to top button