नाशिक : बळकावलेल्या जमिनी परत करा, इगतपुरीतील आदिवासी बांधवांचा मोर्चा

(छायाचित्र : हेमंत घोरपडे)
(छायाचित्र : हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

इगतपुरी तालुक्यात भूमाफियांनी बळकावलेल्या जमिनी परत कराव्या तसेच या सर्व प्रकरणांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आदी मागण्यांसाठी तालुक्यातील आदिवासी बांधवांनी शुक्रवारी (दि. २५) थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

निवेदनाचा आशय असा की, आदिवासी बांधवांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत भूमाफिया त्यांच्या जमिनी बळकावत आहेत. जमीन मोजणीच्या नावाखाली आदिवासींना दुय्यम निबंधक कार्यालयात नेऊन तेथे खोटे-नाटे सांगून कागदपत्रांवर सह्या व अंगठे घेण्याचे काम केले जात आहे. बॅंकेतही खाते उघडण्याच्या बहाण्याने घेऊन जाताना खातेदाराचे बँकखात्याचे पासबुक व चेकबुक हे भूमाफिया जबरदस्तीने स्वत:जवळ ठेवत आहेत. या सर्व प्रकारांत आदिवासी बांधवांची हातची जमीन जात असून, त्यांना मोबदल्याचे पैसेही मिळत नाहीत. परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याची व्यथा निवेदनात नमूद करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणांत महसूल व बॅंकेच्या अधिकाऱ्यांचे भूमाफियांशी संगनमत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

अन्यायग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांना त्यांचा हक्क प्रस्थापित होण्यासाठी या प्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करावी. संबंधित प्रकरणांच्या चाैकशीसह यात सहभागी बँक अधिकारी व महसूल कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तसेच या सर्व प्रकारांत आदिवासी खातेदार व कष्टकऱ्यांना सरकारी बाजारभावाचा मोबदला न देताच भूमाफियांनी बळकावलेल्या जमिनी परत कराव्यात आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. याबाबत तातडीने न्याय न मिळाल्यास मुंबईत मंत्रालयासमोर बेमुदत उपोषण केले जाईल. तसेच न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news