रुईछत्तीशी परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष्य; पिण्यासाठी पाणी विकत घेण्याची वेळ | पुढारी

रुईछत्तीशी परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष्य; पिण्यासाठी पाणी विकत घेण्याची वेळ

रुईछत्तीशी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील रुईछत्तिशी परिसरात शेतकर्‍यांना दैनंदिन वापरासाठी पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. रुईछत्तीशी व शेजारील गावांना बुर्‍हाणनगर पाणी योजनेतून पाणीपुरवठा होतो. परंतु नगर-सोलापूर मार्गाचे काम चालू असल्याने या योजनेची अवस्था बिकट झाली आहे. पंधरा दिवसांतून एकदा पाणी सुटत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.महामार्गावरील गावे असून कोणताही लोकप्रतिनिधी या भागाची समस्या जाणून घेण्यास तयार नाही.खासदार व आमदार दोन्हीही सत्तेत असून शेतकर्‍यांची व ग्रामस्थांची समस्या जाणून घेण्यास कोणीही तयार नाही.

गेल्या महिन्यापासून पाऊस गायब झाला आहे. पिके धोक्यात येऊन शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पिकांचे पंचनामे करण्याची मागणी होऊ लागली आहे.कोणताही महसूल अधिकारी शेतकर्‍यांच्या बांधावर आला नाही. राज्य सरकारने ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे. पिकांचे पंचनामे करण्यासाठी राज्य सरकारने जिल्हा स्तरावर आढावा बैठक घ्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.

पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे. एकीकडे पिके पावसाअभावी संकटात तर दुसरीकडे नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही, यामुळे रुईछत्तीशी परिसरात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. जनावरांच्या चार्‍याचा मोठा प्रश्न गंभीर होत चालला आहे. जनावरांचा चारा व पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत असल्याने शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होण्याची चिन्हे आहेत, असे वाटेफळचे आदर्श शेतकरी रवींद्र अमृते म्हणाले.

हेही वाचा

नाशिककरांनो काळजी घ्या! शहराभोवती वाढतोय डेंग्यूचा विळखा

Solapur | कांदा व्यापार्‍याची साडेचार कोटींची फसवणूक, केरळच्या दोन एजन्सीजवर गुन्हा

अहमदनगर : खरीप ’मातीत’ तर रब्बीवर दुष्काळाचे ’मळभ’

Back to top button