परवडत नसेल तर कांदा खाऊ नका! दादा भुसे यांचा सल्ला

परवडत नसेल तर कांदा खाऊ नका! दादा भुसे यांचा सल्ला
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

एकीकडे केंद्र सरकारने कांदा निर्यातीच्या शु्ल्कात वाढ केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावण असताना राजकीय नेत्यांमध्ये कांद्यावरून चांगलेच वाक‌्युद्ध रंगले आहे. 'ज्याला कांदा परवडत नाही, त्याने दोन, चार महिने कांदा खाल्ला नाही, तर बिघडत नाही' असा अजब सल्ला पालकमंत्री दादा भुसे यांनी दिला. 'कांदादर पडणार नाही, याची काळजी सरकारच्या वतीने घेतली जाईल, असे आश्वासनही भुसे यांनी दिले आहे.

केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्कात ४० टक्क्यांची वाढ केल्याने नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागांत आंदोलने पेटली आहेत. यासंदर्भात पालकमंत्री भुसे यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारले असता ते म्हणाले की, निर्यात शुल्क वाढीमुळे निर्यात घटून कांद्याचे दर कोसळतील, अशी भीती शेतकऱ्यांना आहे. ज्यांनी कांदा खरेदी केला आणि निर्यात करण्याच्या तयारीत होते, अशा व्यापाऱ्यांनादेखील थोडी भीती वाटत आहे. शेतकरी, व्यापाऱ्यांच्या भावना केंद्र सरकारच्या कानावर घातल्या जातील. केंद्र सरकार निश्चितच सकारात्मक मार्ग काढेल, हा सत्ताधारी, विरोधक असा विषय नाही. काही वेळा कांद्याला २०० ते ३०० भाव मिळतात, तर काही वेळा २ हजारपर्यंत भाव जातात. उत्पादन-पुरवठा याचे नियोजन करावे लागते. नाशिक जिल्ह्यात कांदा हा संवेदनशील विषय आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळाला, तर काही समस्या नाही. ज्यावेळी आपण लाखांची गाडी वापरतो, त्यावेळी १० रुपये जास्त देऊन २० रुपये दराने कांदा खरेदी करावा. ज्याला कांदा परवडत नाही, त्याने दोन-चार महिने कांदा खाल्ला नाही, तर बिघडत नाही, असा सल्ला त्यांनी दिला. या प्रश्नावर चर्चा करून मार्ग काढला जाईल. सर्व व्यवहार सुरळीत होतील, असे नियोजन केले जाईल, असेही भुसे म्हणाले.

दर पडणार नाहीत याची काळजी सरकार घेईल!

केंद्राच्या निर्णयामुळे कांदादर कोसळण्याची भीती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. त्यावर ना. भुसे म्हणाले की, हा निर्णय झाल्यानंतर आज बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे दर पडले किंवा काय झाले, हे या क्षणाला बोलणे उचित नाही. मात्र, कांदादर पडणार नाहीत, याची काळजी सरकारच्या वतीने घेतली जाईल. तसेच या विषयासंदर्भात किंवा चांगल्या गोष्टीसाठी शरद पवारच काय, कुणी पण असेल, त्यांच्याकडून चांगले मार्गदर्शन मिळणार असेल, तर स्वागतच असेल. कारण कांद्याच्या प्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे, असेही भुसे यांनी स्पष्ट केले.

तर राऊतांना मतदारराजा कळेल!

ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर दादा भुसे म्हणाले की, त्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. जनतेमध्ये आल्यानंतर मतदारराजा काय असतो, हे त्यांना कळेल. एसी केबिनमध्ये बसून जनतेचे प्रश्न कळत नसतात, असा खोचक टोला भुसे यांनी लगावला. समृद्धी महामार्गावर अपघात रोखण्यासाठी अनेक उपाय राबवले गेले. अपघात रोखण्यासाठी इतर काही मार्गदर्शन आले, तर त्याचीदेखील अंमलबजावणी केली जाईल, असेही भुसे यांनी सांगीतले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news