धुळे : दुचाकीस्वारांच्या डोळ्यात मिरची फूड टाकून लुटणारी टोळी गजाआड | पुढारी

धुळे : दुचाकीस्वारांच्या डोळ्यात मिरची फूड टाकून लुटणारी टोळी गजाआड

धुळे, पुढारी वृत्तसेवा : महामार्गावर दुचाकी चालकांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून शस्त्राचा धाक दाखवून लूट करणाऱ्या टोळीतील तिघांना आझाद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांच्या पथकाने गजाआड केले आहे. या चोरट्यांकडून त्यांनी लूट केलेला ऐवज जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे आझाद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक देशमुख यांच्या पथकाला दहा हजार रुपयांचे बक्षीस पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी जाहीर केले आहे.

धुळे शहरालगत असणाऱ्या महामार्गावर गेल्या काही महिन्यांपासून लुटीचे प्रकार वाढले होते. वाहन चालकांना अडवून त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकल्यानंतर पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांची रोकड आणि मोबाईल यांची लूट संबंधित चोरटे करत असल्याची बाब घडली होती. या सर्व चोऱ्या सारख्याच प्रकाराच्या असल्यामुळे या टोळक्याला गजाआड करण्यासाठी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड ,अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपअधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांनी सर्वच पोलीस ठाण्यांच्या प्रभारींना गस्तीचे आदेश दिले होते. त्यानुसार आझाद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांनी कोंबिंग ऑपरेशन सह तपासणी मोहीम सुरू केली. त्यातच त्यांना एका दुचाकीवरून पारोळा रोड चौफुली वरून धुळे शहरात तीन तरुण येत असून त्यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शहरातील गिदोडिया चौकात सापळा लावून या तिघा चोरट्यांना निरीक्षक देशमुख आणि त्यांच्या पथकाने ताब्यात घेतले.या तरुणांची चौकशी केली असता त्यांची नाव शेखर दत्तू वाघमोडे, चेतन जिभाऊ पाटील तसेच विकास संजय केदारे असे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून पिस्तूल आणि जिवंत काढतुस आढळून आले. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मात्र चौकशीत या चोरट्यांनी महामार्गावर दुचाकी चालकांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून त्यांचे वाहन तसेच ऐवज चोरल्याची माहिती देखील दिली. त्यामुळे धुळे शहरालगत असलेल्या वेगवेगळ्या तीन ते चार चोऱ्यांचा उलगडा झाला आहे. या चोरट्यांनी नगाव बारी परिसरात दोन तर तिखी फाटा परिसरात एका तरुणाला लूट केल्याची कबुली दिली आहे. या चोरट्यांकडून लूट केलेल्या ऐवज जप्त करण्यात आला असून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान आझाद नगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे तिघे अट्टल चोरटे गजाआड झाल्यामुळे पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या पथकाला दहा हजार रुपयांचे बक्षीस पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी जाहीर केले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button