नाशिक : एनएमआरडीएच्या आयुक्तपदी सतिशकुमार खडके | पुढारी

नाशिक : एनएमआरडीएच्या आयुक्तपदी सतिशकुमार खडके

नाशिक: पुढारी वृत्तसेवा

नाशिक महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात एनएमआरडीएच्या स्थापनेनंतर तब्बल आठ वर्षानंतर पुर्णवेळ आयुक्त मिळाले आहेत. सिडकोचे मुख्य जमीन मोजणी अधिकारी सतीशकुमार खडके यांची प्राधिकरणाच्या महानगर आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकसह परिसराच्या विकासाला गती मिळणार आहे. पुढील आठवड्यात खडके हे पदभार स्विकारणार आहेत.

मुंबई, पुण्यापाठोपाठ नाशिक शहर झपाट्याने विकसित होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे शहर परिसराला बकालावस्था येत आहे. नाशिक, दिंडोरी, इगतपुरी, सिन्नर या लगतच्या तालुक्यांपर्यंत वसाहती वाढत आहेत. त्यामुळे या भागाचा विकास नियोजनपूर्वक व्हावा यासाठी राज्य सरकारने २०१५-१६ मध्ये नाशिक महानगर विकास प्राधिकरण स्थापन केले होते. याचे आयुक्तपद विभागीय आयुक्तांकडे होते. त्यामुळे प्राधिकरणाचा कारभार हा कागदावरच होता. परंतु, आता सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने प्राधिकरणाला चाल दिली आहे. शुक्रवारी राज्यसरकारने या प्राधिकरणासाठी स्वतंत्रपणे खडके यांची महानगर आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. जळगाव प्रांत तसेच नाशिक महापालिकेत उपायुक्त म्हणूनही खडके यांनी काम पाहिले असून ते सध्या सिडकोत मुख्य जमीन मोजणी अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. पुढील आठवड्यात ते महानगर आयुक्त पदाचा पदभार घेणार असल्यामुळे नाशिक शहरासह परिसराच्या विकासाला चालना मिळणार आहे.

हेही वाचा :

Back to top button