पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे ! | पुढारी

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे !

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आळेखिंड ते कर्‍हे घाट परिसरात महामार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे या खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डा चुकविण्याच्या नादात अपघात होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. रिमझिम पाऊस पडत असलेल्या खड्ड्यात पाणी साचून चालकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याचे साधे सोयरे सुतकही टोल वसुली करणार्‍या कंपनीला नसल्याचे दिसत आहे.

पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पावसामुळे ठीक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले होते, मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग आणि टोल वसुली कंपनी यांनी थातूरमातूर पद्धतीने खड्डे बुजविले होते. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असताना महामार्गावर आळेखिंड- बोटा बाह्यवळण मार्ग, नवीन माहुली घाट, चंदनापुरी घाट, रायतेवाडी फाटा, संगमनेर बाह्यवळण रस्ता आणि सायखिंडी फाटा या ठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक वेळा अपघातही होण्याचा शक्यता आहे.

या खड्ड्यामध्ये वाहने आदळत असल्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. महामार्ग झाल्यापासून अनेक टोल प्लाजा कंपन्या आल्या, परंतु त्यांनी महामार्ग दुरुस्तीचे कुठलेही काम हाती घेतले दिसत नाही. फक्त महामार्गावरुन जाणार्‍या येणार्‍या वाहन चालकांकडून अव्वाच्या सव्वा दराने टोल वसुली करत आहे. चांगला रस्ता देण्यात कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग कमी पडत असल्याचे महामार्गाच्या सध्याच्या झालेल्या दुरावस्थेवरून दिसून येते.

खड्डे बुजवा अन्यथा आंदोलन : डाके
सतत होणार्‍या रिमझिम पावसामुळे महामार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्याकडे टोल प्रशासन कंपनीने लक्ष देण्याचे सोडून फक्त टोल वसुली करण्यात धन्यता मानत आहे. दुर्लक्षामुळे महामार्गावर पडलेले खड्डे लवकरात लवकर खडी व डांबराने बुजवून वाहन चालकांची होणारी अडचण दूर करावी, नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे -रस्ते साधन सुविधा विभागाचे उत्तर नगर जिल्ह्याचे संघटक किशोर डोके यांनी दिला आहे.

Back to top button