

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : प्रसिद्ध निसर्ग कवी ना. धों. महानोर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 81व्या वर्षी पुण्यातील रुबी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे.
मराठी कवी, गीतकार, शेतकरी, आणि माजी आमदार म्हणून ते परिचित होते. महानोर यांनी काव्यसंग्रहांबरोबरच अनेक चित्रपटांसाठीही सुप्रसिद्ध गाणी लिहिली. कवितांप्रमाणेच त्यांच्या या गीतांना पसंती मिळाली. त्यांचा हा प्रवास खऱ्या अर्थाने काळ्या आईच्या कुशीतूनच सुरु झाला, शेती करता करता त्यांना काव्याचे स्फुरण झाले. पुढे ६० वर्षाहून अधिक काळ त्यांनी साहित्यक्षेत्रात कार्य केले. निसर्गकवी म्हणून ओळखले जाऊ लागले.
ना.धों. महानोरांचा जन्म १६ सप्टेंबर १९४२ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेडच्या शेतकरी कुटुंबात झाला. आई-वडील दुसऱ्याच्या शेतात काम करुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत असत. महानोरांना चार भाऊ आणि तीन बहिणी. महानोर सगळ्यांत थोरले. पळसखेडला येथील शाळेत त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. पुढे वयाच्या दहाव्या वर्षी पुढील शिक्षणासाठी ते ८-१० कि.मी. अंतरावर असलेल्या जामनेर तालुक्यातील शेंदुर्णीच्या शाळेत जायचे. शेंदुर्णी येथे शिक्षण घेता घेताच त्यांची कवितेशी ओळख झाली. शालेय शिक्षणासोबत कविता वाचणे, ऐकणे याची आवड त्यांना लागली होती. पुढे जाऊन हीच कवितेची आवड त्यांची ओळख बनली.
रानात राहणारा निसर्ग कवी
ना.धों. महानोर यांनी आपल्या उच्च शिक्षणासाठी जळगाव येथे जाण्याचा निर्णय घेतला. मूळजी जेठा महाविद्यालयात कला शाखेत त्यांनी प्रवेश घेतला. परंतु घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना शिक्षण घेताना अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांना वर्षभरातच शिक्षण अर्धवट सोडून गावाकडे माघारी जावे लागले. त्यांच्या वडिलांनी स्वत:ची पाच एकर कोरडवाहू जमीन विकत घेतली होती आणि शेतीच्या कामांसाठी वडिलांना मुलाची गरज होती.
महानोरानी शिक्षण सोडून शेतीची कास धरली. पण याच शेतीने अथवा निसर्गाने त्यांच्यातला कवीला प्रेरणा दिली. ना. धों. यांच्या अद्भुत निसर्गकवितांनी वाचक-रसिकांना वेड लावलं आहे. ना.धों. महानोर यांच्या कविता इतक्या बोलक्या होत्या की, ते निसर्गाशी संवाद साधत आहेत आणि त्याच कागदावर उमटवत आहेत असा भास व्हायचा. मराठी साहित्यविश्वात ते 'रानकवी' म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांच्या कवितांवर बालकवींचा प्रभाव जाणवतो. ना.धों. महानोर यांनी 'पानझड', 'तिची कहाणी', 'रानातल्या कविता' गाण्यांमधून पळसखेडची मराठवाडी लोकगीते प्रसिद्ध केली.
.हेही वाचा