

इगतपुरी जि.नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकचा इगतपुरी तालुका हा भात पिकासाठी प्रसिद्ध आहे. भातपिकाचे आगार व पावसाचे माहेरघर अशी इगतपुरी तालुक्याची ओळख आहे. तालुक्यात १००८, कोळम, इंद्रायणी या पारंपारिक भातासह संकरित विकसित भाताच्या वाणालाही तालुक्यात उत्तम प्रतिसाद आहे. तालुक्यातील डोंगरी भागात पावसाचे प्रमाण अधिक असून पावसाळ्यात दरवर्षी सरासरी साडेचार ते पाच हजार मिलिमिटर पाऊस पडतो. यामुळे दरवर्षी शेतकरी कोळम आणि इंद्रायणी भातांची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. भाता बरोबरच नागली, वरई आदी पिकांची ही पेरणी केली जाते.
तालुक्यात पारंपारिक चारसुत्री, पट्टा पद्धत, एस आर टी व इतर पद्धतीने भात लागवड केली जाते. यंदा पावसाळा उशिरा सुरू झाल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने भात लावणीला जोरदार सुरुवात झाली आहे. तळेगाव, भावली, दारणा, वैतरणा, अस्वली आदी परिसरातील शेतकरी धरणाच्या पाण्यावर भात पेरणी करतात. भात रोपे चांगल्या प्रमाणात उगवून झाली की उगवलेली रोपे लावण्या योग्य झाल्याने तसेच पाऊस चांगला झाल्याने भातखाचरात मुबलक पाणी साचल्याने शेतकऱ्यांनी आता भात लावणीला सुरुवात केली असून भात लावणीला वेग आला आहे.
तर तालुक्यातील इतर काही भागात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी पुढील दहा पंधरा दिवसात भात लावणीला सुरुवात करणार आहे. इगतपुरी तालुक्यात जूनच्या मध्यलाच पावसाला सुरुवात होते. मात्र जूनच्या सुरुवातीला दोन दिवस पाऊस झाल्यामुळे शेतकरी वर्गाने पेरणीवर भर दिला. इगतपुरी तालुक्यात सर्वत्र शेतकरी बांधवानी भात बीयाणांची पेरणी केली. शेतकरी वर्गाने हजारो रुपये खर्च करून पेरणी केल्यानंतर मात्र पावसाने काही भागात ओढ दिली. इगतपुरी तालुक्यात पश्चिम पट्यात थोडाफार पाऊस झाला पूर्व भागात मात्र पाऊसच न झाल्याने दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. मात्र काही ठिकाणी पावसाची उघडझाप अशीच सुरु राहिली तर भात लावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :