धक्कादायक ! लग्न होत नसल्याने जन्मदात्या आईलाच डिझेल टाकून पेटविण्याचा प्रयत्न | पुढारी

धक्कादायक ! लग्न होत नसल्याने जन्मदात्या आईलाच डिझेल टाकून पेटविण्याचा प्रयत्न

ओतूर : पुढारी वृत्तसेवा :  लग्न होत नसल्याने जन्मदात्या मातेचे हातपाय बांधून तिच्या अंगावर डिझेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न करणार्‍या मुलाला ओतूर पोलिसांनी अटक केली. जुन्नर तालुक्यातील कैलासनगर, हिवरे बुद्रुक येथे दि. 13 फेब—ुवारी रोजी हा धक्कादायक प्रकार घडला. विशेष बाब म्हणजे, पीडित माता मुलाच्या भीतीपोटी घर सोडून आळंदी येथे पळून आली होती, तर तिकडे मुलाने आई बेपत्ता झाल्याची खोटी तक्रार ओतूर ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी केलेल्या तपासात पीडिता इंद्रायणी नदीघाटावर शनिवारी (दि. 15) आढळून आली. या वेळी पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही खळबळजनक घटना उघड झाली.

विमल विठ्ठल भोर (वय 67) असे या पीडित मातेचे नाव आहे, तर तिचा मुलगा मंगेश विठ्ठल भोर (वय 30, दोघेही रा. कैलासनगर, हिवरे बुद्रुक, ता. जुन्नर) याला ओतूर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमल भोर ह्या घरातून बेपत्ता झाल्याची फिर्याद त्यांचा मुलगा मंगेश याने दि. 9 मार्च रोजी ओतूर पोलिस ठाण्यात नोंदविली होती. त्यानुसार ओतूर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान विमल ह्या आळंदी येथील इंद्रायणी घाटावर मिळून आल्या. याबाबत त्यांच्याकडे पोलिसांनी विचारणा केली असता त्यांनी धक्कादायक खुलासा केला. मुलगा मंगेश यास दारूचे व्यसन असून, त्याचे लग्न होत नसल्याने तो सतत शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करतो. त्याच्या भीतीने यापूर्वीदेखील तीन वेळेस घर सोडून निघून गेल्याचे त्यांनी सांगितले.

दि. 13 फेब—ुवारीला मंगेशने त्याची बहीण सुनीता सुनील कुटे हिला फोन केला. मात्र, तिने फोन उचलला नसल्याच्या कारणावरून मंगेशने विमल यांना शिवीगाळ करून लाथा मारल्या. त्यानंतर तुला आज जिवंतच ठेवत नाही, असे म्हणून जिवे मारण्याच्या उद्देशाने तिचे नायलॉनच्या दोरीने हातपाय बांधले. त्यानंतर अंगावर डिझेल ओतून तिला पेटविण्यासाठी माचीस शोधू लागला. मात्र, ती न मिळाल्याने घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावली आणि माचीस आणायला तो बाहेर गेला. हीच संधी साधून विमल यांनी हातापायाला बांधलेली दोरी सोडली व मागच्या दरवाजाने त्या पळून गेल्या.

त्यानंतर मंगेशच्या भीतीमुळे थेट आळंदी गाठल्याचे विमल यांनी सांगितले. इकडे मंगेशने त्याची आई विमल ह्या बेपत्ता झाल्याची खोटी तक्रार नोंदवली होती. याच तक्रारीवरून पोलिस विमलपर्यंत पोहचले आणि हा सर्व प्रकार समोर आला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून मंगेशला अटक केली. त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जुन्नर यांच्यासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानुसार मंगेशची येरवडा कारागृहात रवानगी केली. सहायक पोलिस निरिक्षक एस. व्ही. कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ए. सी. केरुरकर अधिक तपास करीत आहेत.

हे ही वाचा : 

पिंपरी : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची कार्यकारिणी समितीची घोषणा

पुणे शहराची तहान दहा वर्षांत 6 टीएमसीने वाढली

Back to top button