

दहिगावने : पुढारी वृत्तसेवा : शेवगाव तालुक्यातील देवटाकळी शिवारात संदीप खरड यांच्या वस्तीवर, तर शहरटाकळी येथील सुभाष मुगंसे यांच्या शेतात बिबट्याचा वावर आढळून आला आहे. देवटाकळी येथे शेळीवर, तर मजलेशहर येथे कुत्र्यावर हल्ला केल्याने ग्रामस्थांंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पशुपालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर, बिबट्यामुळे उसाच्या शेतातील रानडुकरांनी चक्क पाळीव प्राण्यांच्या गोठ्याचा आसरा घेतला आहे.
बुधवारी सकाळी 7 च्या सुमारास संदीप खरड यांना राहत्या घराशेजारी बिबट्या येऊन गेल्याच्या पाऊलखुणा दिसल्या. त्यांनी वनविभागाच्या अधिकार्यांना याची माहिती दिली. वनविभागाच्या अधिकारी, कर्मचार्यांनी भेअ देत हे बिबट्याच्या पावलाचे ठसे असल्याचे सांगितले. देवटाकळी येथील संतोष एकनाथ रोकडे यांची शेळीवर हल्ला बिबट्यानेच केल्याचे वनरक्षक स्वाती ढोले यांनी सांगितले.
बिबट्याने रात्री मजलेशहर येथील वन कर्मचारी प्रतीक लोंढे यांच्या कुत्र्यावर हल्ला केला. कनगरे यांच्या वासरावर हल्ला केल्यामुळे जखमी झाले आहे.
शहरटाकळी येथील सुभाष मुंगसे यांच्या शेतात बिबट्याचा वावर असल्याचे पायाचे ठसे दिसतात. संदीप खरड यांनी वनविभागाला माहिती देण्यात आल्यानंतर तात्काळ पिंजरा लावण्यात आला. नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन वनविभागाच्या वतीने वनपरिमंडल अधिकारी आर. एम. शिरसाट, वनरक्षक स्वाती ढोले यांनी केले.
वनविभागाच्या सूचना पाळा
भाविनिमगाव, दहिगावने, रांजणी परिसरात बिबट्याने काही महिन्यांपूर्वी पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. आता शहरटाकळी मजलेशहर, देवटाकळी येथे शेळीवर हल्ला केला आहे. त्यामुळे वनविभागाच्या खबरदारीच्या उपायांकडे ग्रामस्थांनी गांभीर्याने पाहावे, असे संदीप खरड म्हणाले.
हेही वाचा :