नाशिक : शासन आपल्या दारी’ कार्यक्रम संपेपर्यंत गंगापूर रोडवर एकेरी वाहतूक

नाशिक : शासन आपल्या दारी’ कार्यक्रम संपेपर्यंत गंगापूर रोडवर एकेरी वाहतूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमासाठी गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृहाचे मैदान निवडले असून, तेथील तयारी अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून हजारो लाभार्थी येणार असल्याने वाहतूक कोंंडीची शक्यता गृहीत धरून शहर पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले आहे. त्यानुसार गंगापूर रोडवर कार्यक्रम संपेपर्यंत एकेरी वाहतूक राहणार असून, लाभार्थ्यांना सिटीलिंक बसमधून ईदगाह मैदानावरून कार्यक्रमस्थळी आणले जाणार आहे.

गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर 'शासन आपल्या दारी'चे शनिवारी (दि. १५) आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह इतर मंत्री उपस्थित राहणार आहेत. शासन आपल्या दारीच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे १० लाख लाभार्थ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेतला आहे. त्यापैकी हजारो लाभार्थी शनिवारी होणाऱ्या कार्यक्रमासाठी हजर राहणार आहेत. या लाभार्थ्यांना गावपातळीवरून घेऊन येणे व परत पोहोचवण्यासाठी राज्य महामंडळाच्या बस घेतल्या आहेत. लाभार्थी बसमधून थेट गंगापूर रोडवरील कार्यक्रमस्थळी येतील. तर या बसेस त्र्यंबक रोडवरील ईदगाह मैदानावर थांबणार आहेत. कार्यक्रम संपल्यानंतर लाभार्थींना पुन्हा त्याच बसमधून पाठवण्याचे नियोजन, शहर वाहतूक पोलिसांनी केले आहे.

अशी असेल एकेरी वाहतूक

गंगापूर रोडवर शनिवारी (दि.१५) वाहतुकीची कोंडी होऊन समस्या उद्‌भवण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम संपेपर्यंत गंगापूर रोडवर एकेरी वाहतूक केली जाणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक काही तासांसाठी पर्यायी मार्गांनी वळविणार आहे. त्यानुसार अशोक स्तंभाकडून येणारी वाहतूक रोखून ती पर्यायी मार्गाने वळविली जाणार आहे. तर, गंगापूर रोडकडून अशोकस्तंभाकडे जाणारी एकेरी वाहतूक सुरू राहील. त्याचप्रमाणे, कॅनडा कॉर्नरकडून जुना गंगापूर नाक्याकडे जाणारी वाहतूकही रोखली जाईल. ही वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली जाईल.

शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियोजनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पार्किंग व्यवस्था ईदगाह मैदानावर आहे. लाभार्थ्यांना घेऊन बस कार्यक्रमस्थळी येणार आहेत. गंगापूर रोडवरील वाहतूक एकेरी केली जाईल. नियोजन निश्चित झाल्यानंतर तशी अधिसूचना देण्यात येईल.

– मोनिका राऊत, पाेलिस उपआयुक्त, वाहतूक शाखा

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news