Onion Rate : सणासुदीत शेतकऱ्यांवर संकट, कांद्याचे भाव गडगडले | पुढारी

Onion Rate : सणासुदीत शेतकऱ्यांवर संकट, कांद्याचे भाव गडगडले

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा

नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याला कमाल ३ हजार १०० ते ३ हजार ३०० रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे. तर दुसरीकडे सोलापूर, मोरशी, चंद्रपूर, कर्जत या बाजार समित्यांमध्ये कांद्याला कमाल साडेचार हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे. प्राप्तिकर विभागाच्या छाप्यानंतर नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांनी भाव वाढीचा चांगलाच धसका घेतल्याचे वरील आकडेवारीवरून दिसत आहे. (Onion Rate)

येथील मुख्य बाजार समितीत उन्हाळ कांद्याचे दर तीन दिवसांत ३५० रुपये प्रति क्विंटलने घसरले आहे. उन्हाळ कांद्याला येथील मुख्य बाजार आवारात सरासरी २४०० रुपये भाव मिळाला. गेल्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीत आयकर विभागाचे छापे पडल्यानंतर जिल्ह्यातील बाजार समितीत कांदा भाव मोठ्या प्रमाणात पडले. तर सोलापूर, मोरशी, चंद्रपूर या बाजार समितीत कांद्याची ४ हजार ते ४ हजार ६०० रुपये प्रति क्विंटलने विक्री होत आहे.

Onion Rate : लासलगांव बाजारसमितीत ११ दिवस कांद्याचा लिलाव नाही

दुसरीकडे लासलगांव कांदा व्यापारी असोशिएशने बाजार समितीला दिलेल्या पत्रानुसार व्यापारी वर्गाचे कांदा खळ्यावरील मजूर वर्ग दिपावली सणानिमित्ताने बाहेरगावी जाणार आहेत. यामुळे कांदा लिलावाचे कामकाजात त्यांचा सहभाग नसेल. यामुळे लासलगांव मुख्य बाजार लिलाव  ११ दिवस बंद राहणार आहे. शनिवार, रविवार आणि सलग आलेल्या सुट्यामुळे मात्र शेतकरी वर्गाचे हाल होणार आहे.

कांद्याचं आगार समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत (दि.२८) कमाल ३१०० रुपये भाव मिळाला आहे. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात कांद्याचे नुकसान झाले असून खरीप कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र प्राप्तिकर विभागाच्या छाप्यानंतर दररोज कांदा भावात घसरण होत असल्याने शेतकरी वर्गाला नुकसान सोसावे लागत आहे.

प्राप्तिकर विभागाच्या कारवाईने धास्ती

पिंपळगाव बसवंत येथे प्राप्तिकर विभागाने २१ व २२ ऑक्टोबर रोजी काही कांदा व्यापाऱ्यांवर धाडी टाकल्या होत्या. या कारवाईत २५ कोटींची रक्कम जप्त केल्याच्या चर्चेने खळबळ उडाली होती. मात्र, या कारवाईचे पडसाद कांद्याच्या दरावर उमटले असून, या प्रतिक्विंटल ४५०० पर्यंत गेलेल्या उन्हाळ कांद्याचे दर अवघ्या चारच दिवसांत १ हजार रुपयांपर्यंत खाली आले आहे. मात्र राज्यातील इतर बाजार समितीत चित्र काही वेगळेच बघायला मिळत आहे.

लासलगाव येथील मुख्य बाजार समितीच्या आवारात उन्हाळ कांद्याला किमान ७००,कमाल ३१०० तर सरासरी २४०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. राज्यातील प्रमुख बाजार समितीतील कमाल कांदा भाव (आकडेवारी पणन वेबसाईटवरून)

लासलगाव – ३१०० रुपये

पिंपळगाव बसवंत -३४०० रुपये

सोलापूर – ४५०० रुपये

मोरशी- ४६०० रुपये

चंद्रपूर -४००० रुपये

Back to top button