नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शरद पवार यांची आशीर्वाद देण्याची स्टाइल जरा वेगळी आहे. येवल्यात सभा घेत आहेत, त्यानुसार येवल्यात ज्यांच्यावर अन्याय झाला, त्यांना ते भरभरून आशीर्वाद देतील. ते आशीर्वाद कसे असतील, हे येत्या काळात समजेलच, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले. शरद पवार यांची शनिवारी (दि. 8) येवल्यात सभा होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये रोहित पवार पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आ. सुनील भुसारा, जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
राेहित पवार म्हणाले, पावसाचे वातावरण, खरिपाची लागवड तसेच इतर अनेक कारणांनी हा दौरा पुढे ढकलण्याबाबत शरद पवार यांनी सुचवले होते. मात्र कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी हट्ट केल्याने त्यांनी तीन जिल्ह्यांचा असलेला हा दौरा फक्त नाशिकपुरताच मर्यादित केला आहे. राजकीय नाट्यानंतर पवारांनी, आता जनतेत जाऊन कौल मागणार असल्याचे सांगितले होते, त्यानुसार आता हा दौरा होत आहे. हा दौरा आता पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उत्स्फूर्तपणे हाती घेतला आहे. त्यामुळे सभा यशस्वी होणार आहे. भविष्यात सर्वांना निवडणुका लढवाव्या लागणार आहेत, त्यासाठी त्यांना जनतेत उतरावे लागेल. जनता त्यांना उत्तर देईल, असेही रोहित पवार म्हणाले.
भारतीय जनता पक्षाला निवडणुकीची भीती वाटते आहे. त्यामुळे त्यांनी हे फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. एक वर्षापूर्वी त्यांनी एकनाथ शिंदेंना फोडले, त्यांचे महत्त्व वाढू नये म्हणून त्यांनी आता अजित पवारांसह इतर आमदारांना फोडले. घर फोडले, पक्ष फोडला, ही नीती भाजपची आहे, त्यांना जनतेसमोर जायला असुरक्षित वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले.
भाजप लोकांना जवळ करतो आणि संपवतो. अजित पवारांनी त्यांच्यासोबत जाऊन विचार तर संपवला आहेच. मात्र, आता त्यांची कार्यपद्धती संपायला नको. काकांच्या बाबतीत मी भावनिक आहे. विरोधी पक्षनेते होण्यासाठी मी सही केली आहे. काकांनी खूप चांगली कामे केली आहेत. त्यांनी विचार बदलणे मला योग्य वाटत नाही. एका बाजूला शॉर्टकट आहे आणि दुसऱ्या बाजूला संघर्ष. राज्याला संघर्ष नवा नाही. साहेबांनी चांगला विचार जपण्यासाठी संघर्ष निवडला आहे. आणि त्याला जनतेचा पाठिंबादेखील आहे, येत्या काळात अनेक समीकरणे बदलतील, असेदेखील रोहित पवार यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा :