नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्य सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम असलेला शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी १५ जुलैची संभाव्य मुहूर्त काढण्यात आला आहे. त्यानुषंगाने पालकंमत्री दादा भुसे यांनी गुरूवारी (दि.६) कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शहरातील विविध जागांची पाहाणी केली.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यत पोहचविण्यासाठी राज्यभरात शासन आपल्या दारी' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नाशिकमध्ये दि. ८ जुलै रोजी हा कार्यक्रम नियोजित होता. मात्र, एैनवेळी तो स्थगित करण्यात आला. कार्यक्रम स्थगित करताना त्याचे कोणतेही ठोस कारण देण्यात आले नसले तरी गेल्या रविवारी (दि.९) राज्यातील राजकीय घडामोडीनंतर सत्ताधाऱ्यांना या कार्यक्रमास हजर राहणे शक्य नसल्याने तोे स्थगित केल्याची चर्चा आहे. दरम्यान, पुन्हा एकदा कार्यक्रम घेण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. राज्य स्तरावरून शनिवारी (दि.१५) संभाव्य मुहूर्त काढण्यात आला आहे. त्यामुळे पालकमंत्री भुसे यांनी तातडीने शहरात दाखल होत तीन ते चार ठिकाणी संभाव्य जागेची पाहाणी केली. तसेच गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर हा कार्यक्रम घेण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. दरम्यान, शनिवार (दि.१५) ही कायक्रमाची संभाव्य तारीख आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत तारखेबद्दल चर्चा करून ती निश्चित केली जाईल. सोमवारपासून (दि. १७) पावसाळी अधिवेशन असल्याने त्याआधीच हा कार्यक्रम घेण्याचे नियोजन असल्याचे भुसे यांनी सांगितले.
शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून ७५ हजार नागरिक हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे ना. भुसे यांनी जागांची पाहाणी करण्यापूर्वी अधिकाऱ्यांची बैठक घेत कार्यक्रमाच्या नियोजनावर चर्चा केली. शासकीय विश्रामगृहावर झालेल्या या बैठकीप्रसंगी कार्यक्रमास्थळी ७५ हजार लोक बसू शकतील असा वॉटरप्रुफ मंडप, वाहनतळ, नागरिकांसाठी बसेसची सुविधा यासह अन्य बाबींवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकारी गंगाथरण डी., मनपाच्या प्रभारी आयुक्त भाग्यश्री बानाईत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा :