नाशिक : मनपाच्या करभरणा विभागात ३३ लाखांचा अपहार, सात वर्षांनंतर बाब उघड | पुढारी

नाशिक : मनपाच्या करभरणा विभागात ३३ लाखांचा अपहार, सात वर्षांनंतर बाब उघड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी महापालिका चरायचे कुरण बनत असल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या करसंकलन विभागात तीन अधिकाऱ्यांनी तब्बल ३३ लाखांचा अपहार केला असून, गेल्या कित्येक वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. सध्या या तीन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, अपहार केलेल्या कर्मचाऱ्यांकडून आतापर्यंत १७ लाख वसूल केले असून, उर्वरीत वसुलीसाठी मनपा प्रशासनाकडून कसून चौकशी केली जात आहे.

महापालिकेचे सहा ठिकाणी विभागीय कार्यालय असून या ठिकाणी करसंकलन केंद्र आहे. मालमत्ता कर, पाणीपट्टी, जाहिरात परवाने शुल्क यांसह विविध करांचा भरणा नागरिक या ठिकाणी करतात. पण नागरिकांनी भरलेला कर मनपाच्या तिजोरीत जमा करण्याऐवजी या तिघा अधिकार्‍यांनी स्वत:चेच खिसे भरले. सन २०१३ ते १९ य‍ा काल‍ावधीत अधिकार्‍यांनी हा झोल केला. तब्बल सात वर्षांनंतर हा अपहार समोर आला. पंचवटी कार्यालय अधिक्षक कैलास राबडिया, नाशिकरोड अधीक्षक अभियंता सुनील आव्हाड व कनिष्ठ लिपिक आरती मारु या तिघांनी तब्बल ३३ लाखांचा अपहार केला. हा प्रकार समोर आल्यानंतर महापालिका प्रशासनाने तत्काळ तिघांवर निलंबनाची कारवाई केली. त्यांच्याकडून १८ लाखांची भरपाई केली असून उर्वरीत रक्कमही वसूल केली जाणार आहे. शिवाय या तिघ‍ांची विभागीय चौकशी सुरु आहे. त्यामुळे त्यांचा पाय आणखी खोलात जाण्याची चिन्हे आहेत. एकूणच हा प्रकार पाहता महापालिकेत कुंपणचं शेण खात असल्याची उघड चर्चा रंगली आहे.

करसंकलन विभागात ३३ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी तिघा अधिकार्‍यांचे निलंबन करण्यात आले. त्यांची विभागीय चौकशी सुरु आहे.

– लक्ष्मीकांत साताळकर, प्रशासन उपायुक्त

हेही वाचा : 

Back to top button