Positive news : पिंपळगावकरांनी अनुभवला माणुसकीचा गहिवर | पुढारी

Positive news : पिंपळगावकरांनी अनुभवला माणुसकीचा गहिवर

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा
माणूस कितीही भौतिक सुखाच्या मागे लागला, तरी संस्काराची शिदोरी ही त्याच्यासोबत असते. अशा संस्कारक्षम माणसाचे मन नेहमी संवेदनशील असते. असाच काहीसा संवेदनशील मनाचा प्रत्यय पिंपळगाव बसवंतकरांनी अनुभवला. त्यातून माणुसकी आजही जिवंत आहे, हा संदेश सर्वदूर पोहोचवला.

येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेसमोरील मुंबई-आग्रा महामार्गावर पुलाखाली अनेक दिवसांपासून एक अनाथ व्यक्ती विमनस्क अवस्थेत कित्येक वर्षांपासून वास्तव्यास आहे. तिला पुलाखालून जाणारे-येणारे रोज पाहतात. वेडसर म्हणून संबोधत वेळप्रसंगी त्याला अन्नदान करतात. परंतु त्याच्या कळकट अवताराची सगळेच घृणा, तिरस्कार करत. अशा अनाथ आणि समाजाच्या लेखी भिकारी असलेल्या व्यक्तीला पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेचे माजी सदस्य इक्बाल शेठ शेख व मित्रपरिवाराने पाहिले असता, त्यांचे अंतःकरण हेलावले. त्यांनी कोणताही विचार न करता, मित्रांच्या मदतीने वयाची साठी गाठलेल्या त्याअनाथ व्यक्तीला अंघोळ घातली. त्यानंतर दाढी-कटिंग केली. तसेच नवीन कपडे घेऊन देत परिधान करण्यात आले. इकबाल शेख व त्यांच्या मित्रमंडळाने हा अनोखा उपक्रम करून पिंपळगाव बसवंतच्या जनतेत एक वेगळा मानवतेचा संदेश बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर दिला. त्यांच्या या संवेदनशीलतेबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा:

Back to top button