राहुल गांधींच्या विरोधात ट्विट; भाजपचे IT Cell प्रमुख अमित मालवीय यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल | पुढारी

राहुल गांधींच्या विरोधात ट्विट; भाजपचे IT Cell प्रमुख अमित मालवीय यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्याविरोधात बेंगळुरूमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित मालवीय यांनी राहुल गांधींबद्दल वादग्रस्त ट्विट केल्याचा आरोप आहे. काँग्रेसचे माजी आमदार रमेश बाबू यांनी मालवीय यांच्याविरोधात तक्रार केली आहे.

कायदेशीर माहिती घेऊनच एफआयआर दाखल : प्रियांक खर्गे

कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी अमित मालवीय यांच्याविरोधात दाखल केलेल्या एफआयआरवर प्रतिक्रिया दिली. भाजपला जेव्हा जेव्हा कायदेशीर टप्प्यातून जावे लागते तेव्हा ते रडायला लागतात. त्यांना कायद्याचे पालन करण्यात अडचण आहे. एफआयआरचा कोणता भाग चुकीच्या हेतूने दाखल करण्यात आला आहे, याचे भाजपने उत्तर द्यावे. कायदेशीर माहिती घेऊन आम्ही गुन्हा दाखल केला असल्याचे त्यांनी सांगितले.

देशाची प्रतिमा मलिन करण्यात भाजपचा हात : पवन खेरा

“अमित मालवीय यांच्या विरोधात आणखी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. ज्या प्रकारे ते केवळ सत्याशीच खेळत नाहीत तर ते एखाद्याच्या चारित्र्याशी आणि प्रतिमेशी खेळतात. त्यामुळे त्यांच्यावर आणखी गुन्हे दाखल व्हायला हवेत. देशाची प्रतिमा मलिन करण्यात सर्वात जास्त हात कोणाचा असेल तर तो भाजपच्या आयटी सेलचा आहे,” अशी टीका काँग्रेस नेते पवन खेरा यांनी माध्यमांशी बोलताना भाजपवर केली आहे.

Back to top button