Nashik 11th Admission : अकरावी प्रवेशासाठी मुदतवाढ, पहिल्या यादीसाठी आज अखेरची संधी | पुढारी

Nashik 11th Admission : अकरावी प्रवेशासाठी मुदतवाढ, पहिल्या यादीसाठी आज अखेरची संधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीसाठी (Nashik 11th Admission) केंद्रिभूत पद्धतीने ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत असून, शनिवारी (दि.२४) पहिल्या गुणवत्ता यादीच्या प्रवेशाची मुदत संपली. मात्र, या यादीतील अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. त्या पार्श्वभूमीवर एक दिवसाच्या मुदतवाढीचा निर्णय राज्य माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून घेण्यात आला. त्यानुसार सोमवारी (दि.२६) सायंकाळी सहापर्यंत प्रवेश निश्चितीची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

राज्याच्या माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयातर्फे मुंबई, पुणे व पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रामधील कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीसाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश दिले जात आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील ६५ कनिष्ठ महाविद्यालयांत २६ हजार ७२० जागा उपलब्ध आहेत. पहिल्या गुणवत्ता यादीत ११ हजार ९५३ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट दिले होते. त्यापैकी ७ हजार २०० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. तर कोट्याअंतर्गत ७६२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चिती केली आहे. तर १८ हजार ७५८ जागा अद्यापही रिक्त आहेत.

दरम्यान, विद्यार्थी, पालक व काही कनिष्ठ महाविद्यालये यांच्या मागणीनुसार तसेच फेरीची प्रवेशप्रक्रिया व्यवस्थित पूर्ण होण्यासाठी नियमित फेरी एक अंतर्गत प्रवेश घेण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांना सोमवारी (दि.२६) सायंकाळी सहापर्यंत मुदतवाढ दिल्याचे शिक्षण उपसंचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दुसऱ्या यादीचे आज वेळापत्रक

पहिल्या गुणवत्ता यादीत निवड न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. सोमवारी (दि.२६) दुसऱ्या गुणवत्ता यादीचे वेळापत्रक शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यामुळे या यादीकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा : 

Back to top button