Wrestlers call off protest | पाच महिन्यांनंतर कुस्तीपटूंचे आंदोलन मागे, पण कोर्टात लढाई सुरुच राहणार | पुढारी

Wrestlers call off protest | पाच महिन्यांनंतर कुस्तीपटूंचे आंदोलन मागे, पण कोर्टात लढाई सुरुच राहणार

पुढारी ऑनलाईन : भारतीय कुस्ती संघाचे (डब्ल्यूएफआय) माजी अध्यक्ष आणि खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात सुमारे ५ महिने सुरु असलेले आंदोलन कुस्तीपटूंनी मागे घेतले आहे. पण त्यांनी आता न्यायालयात लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हिने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. “न्यायालयात लढा सुरूच राहील”, असे तिने म्हटले आहे. (Wrestlers call off protest)

केंद्र सरकारसोबत झालेल्या कुस्तीपटूंच्या बैठकीत बृजभूषण सिंह यांच्यावर १५ जूनपर्यंत आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार १५ जून रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आल्याने कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे साक्षी मलिकने म्हटले आहे.

पण आता रस्त्याऐवजी न्यायालयात कुस्तीपटूंची लढाई सुरु राहील. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहील, असेही तिने पुढे नमूद केले आहे. नवीन कुस्ती महासंघाची निवडणूक प्रक्रिया दिलेल्या आश्वासनानंतर सुरु झाली आहे. ही निवडणूक ११ जुलै रोजी होईल. सरकारने जी आश्वासने दिली आहेत त्याची आता अंमलबजावणी होण्याची प्रतीक्षा आहे, असे साक्षीने ट्विटमध्ये नमूद केले आहे.

१५ जूनपर्यंत महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाचा तपास पूर्ण करीत आरोपपत्र दाखल करण्याची मागणी कुस्तीपटूंनी केली होती. त्यानुसार लैंगिक शोषणाचे आरोप असलेले भारतीय कुस्ती संघाचे माजी अध्यक्ष, खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात १५ जून रोजी दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. दोन वेगवेगळ्या न्यायालयात पोलिसांनी हे आरोपपत्र दाखल केले आहे.

६ महिला कुस्तीपटूंकडून करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पोलिसांनी राऊज एवेन्यू न्यायालयात हजार पानी आरोपपत्र दाखल केले. तर, अल्पवयीन कुस्तीपटूने केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात पटियाला हाऊस न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पोलीस दलाने ‘पोक्सो’ प्रकरण रद्द करण्यासाठी अहवाल दाखल केला आहे. ४ जुलैला याप्रकरणी सुनावणी घेण्यात येणार आहे.

पोक्सो प्रकरणात तक्रारीच्या आधारे करण्यात आलेल्या तपासाअंती कुठलेही पुरावे मिळाले नाही, असे ५५० पानी अहवालातून पोलिसांनी स्पष्ट केले आहे. यानूसार बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधातील पोक्सो अंतर्गत दाखल गुन्हा हटवण्याची शिफारस पोलिसांनी केली आहे. तक्रारकर्ती पीडितेच्या वडिलांनी तसेच पीडितेच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी हा अहवाल न्यायालयात सादर केला आहे.

७ महिला कुस्तीपटूंनी २१ एप्रिल रोजी दिल्ली पोलिसात बृजभूषण यांच्या विरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दिली होती. तक्रारीनंतर २८ एप्रिल रोजी पोलिसांनी बृजभूषण यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल केले होते. ६ कुस्तीपटूंच्या तक्रारीच्या आधारे एक गुन्हा, तर १ अल्पवयीन पीडितेच्या तक्रारीवरून पोक्सो दाखल करण्यात आला होता.

 हे ही वाचा :

Back to top button