Nashik Crime : म्हसरुळला हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा

Nashik Crime : म्हसरुळला हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील काही हॉटेलमध्ये सर्रास हुक्का पार्लर सुरु असून त्यात तरुणाई नशेच्या आहारी जाताना दिसत आहे. म्हसरुळ पोलिसांनी आडगाव म्हसरुळ लिंकरोडवरील हॉटेल कॅटल हाऊस येथे कारवाई करीत हजारो रुपयांचा हुक्क्याचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांविरोधात तंबाखूजन्य उत्पादने कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांसह विक्री, साठा व वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई होत आहे. त्यातच काही हॉटेलमध्ये हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार म्हसरुळ पोलिसांनी हॉटेल कॅटल हाउसमध्ये छापा मारुन प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थ जप्त केले आहेत. याप्रकरणी हॉटेल मालक सौरभ संजय देशमुख (३२, रा. आडगाव लिंक रोड) व व्यवस्थापक सुरेन्दर प्रेमसिंग धामी (२९, रा. आडगाव लिंकरोड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात पोलिसांनी १८ हजार २३० रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थ, हुक्का पिण्याचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे शहरात हुक्का पार्लर सुरु असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका युवकाने सोशल मीडियावर याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राजरोसपणे चालणारे हुक्का पार्लर पोलिसांना दिसत नाही की, ते सोयिस्कर दुर्लक्ष करतात असा प्रश्न उपस्थित होत आहे. कॉलेजरोड, गंगापूररोड, म्हसरुळ, चांदशी, त्र्यंबकरोडसह शहरातील अनेक ठिकाणच्या रेस्टॉरंट व हॉटेलांमध्ये पार्टी करताना तरुणाई सर्रास ई-सिगारेटसह हुक्क्याचे सेवन करीत असल्याचे बोलले जाते. तरीदेखील अशा आस्थापनांवर कोणी तक्रार केली तरच कारवाई होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news