नाशिक : पावसाळ्याच्या तोंडावर राजापूरला पाण्यासाठी महिलांची भटकंती | पुढारी

नाशिक : पावसाळ्याच्या तोंडावर राजापूरला पाण्यासाठी महिलांची भटकंती

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा

येवला तालुक्यातील राजापूर येथील वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून, सध्या येवला तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. राजापूर येथील वाड्या-वस्त्यांवर पाणीटंचाई असून, टँकरच्या पाण्यावर नागरिकांची तहान भागवली जात आहे.

राजापूर येथे एक टँकरची खेप, सोमठाणजोश एक खेप, पन्हाळसाठे येथे एक खेप असा टँकरने पाणीपुरवठा होत आहे. राजापूर हे गाव मोठे असल्याने दररोज एका वस्तीला पाणी दिले जाते. वाड्या-वस्त्यांवरील ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यासाठी टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. तालुक्यात बऱ्याच ठिकाणी टँकरने पिण्याच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो आहे. राजापूर हे गाव शासनदरबारी टँकरमुक्त गाव म्हणून नोंद आहे. परंतु राजापूर गावाला आतापर्यंत पाणीपुरवठ्यासाठी लाखो रुपये खर्च झालेला आहे. मात्र, उन्हाळ्यात गावाला पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. लोहशिंगवे येथून पिण्याच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. मात्र, त्याठिकाणी विहिरीचे पाणी आटल्याने ‌पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

राजापूर www.pudhari.news

सध्या जिकडे-तिकडे उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जून महिना सुरू होऊन दहा ते पंधरा दिवस झाले व त्यात पावसाचे आगमन लांबल्याने टंचाईची तीव्रता वाढली आहे. यामुळे राजापूर येथे वाड्या-वस्त्यांवर टँकरची संख्या वाढवावी लागेल, असे बोलले जात आहे. पाऊस झाला तरी विहिरींना पाणी लवकर उतरत नसल्याने टँकर हे जुलै महिन्यात सुरू ठेवावे लागण्याची शक्यता आहे. राजापूर गावातील रहिवाशांना वडपाटी पाझर तलावाच्या बाजूने विहिरीतून वापरासाठी भरपूर पाणी आहे. मात्र, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

हेही वाचा:

Back to top button