ही मुख्यमंत्री शिंदेची मोठी झेप, जाहिरातीवरुन भुजबळांची खोचक टीका  | पुढारी

ही मुख्यमंत्री शिंदेची मोठी झेप, जाहिरातीवरुन भुजबळांची खोचक टीका 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आजचे कोणतेही वर्तमानपत्र बघितले तर त्यात मोदी आणि शिंदे दिसत आहेत. या सरकारच्या आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही जाहिरातीत शिंदे-फडणवीस या दोघांचे फोटो असतात. मात्र, आज मला आश्चर्य वाटते की, आज प्रकाशित झालेल्या जाहिरातीमध्ये फक्त ‘देशात मोदी, राज्यात शिंदे’ असे लिहीले आहे. आणि यात देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला स्थान नाही ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी झेप आहे, अशी खोचक टीका माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली.

पुढे बोलताना, बाळासाहेबांची शिवसेना असल्याचा आव शिंदेंकडून केला जातो. मग त्यांच्या जाहिरातीमध्ये बाळासाहेबांचा फोटो नाही, ही अतिशय धक्कादायक बाब आहे. एकवेळ फडणवीसांना विसरले तरी चालेल पण बाळासाहेबांना विसरणे योग्य नाही. कल्याणच्या जागेवरून वाद आहेतच, त्यामुळे झालेला हा फरक सर्वसामान्यांपर्यंत पोहचत आहे. तरी देखिल ते याला नाकारत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 50 लाख जाहिरातीसाठी खर्च करणे खूप मोठी गोष्ट नाही. किंवा त्यापेक्षाही जास्त पैसे दिले तरी फरक पडणार नाही. अशी टीका भुजबळ यांनी केली.

शहा, नड्डा यांच्या नाशिक दौऱ्यावर बोलताना, भाजपचे सर्व नेते महाराष्ट्रात सक्रिय झाले आहेत. ज्यावेळी बोट समुद्रात बुडणार असे वाटायला लागले की, त्यामुळे अशी सक्रियता वाढली जाते. सध्या राज्याच्या कृषीमंत्र्यांच्या पीएवरून वाद सुरू आहे. खताच्या दुकानांवर लूट सुरू आहे. कृषी अधिकारी यांना विचारले की, खत कमी आहेत का? तर ते म्हणतात की, अजिबात नाही. एका अर्थाने लूटालूट सुरू आहे. शेतकरी अडचणीत आहे, त्यात अशी अडवणूक करणाऱ्यांवर पोलिस व कृषी अधिकाऱ्यांनी कारवाई करणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने देखील लक्ष देणे गरजेचे असल्याचे भुजबळ म्हणाले.

हेही वाचा : 

Back to top button