रत्नागिरी : बारसू गोवळमधील कातळशिल्पांची विनायक राऊतांकडून पाहणी | पुढारी

रत्नागिरी : बारसू गोवळमधील कातळशिल्पांची विनायक राऊतांकडून पाहणी

राजापूर, पुढारी वृत्तसेवा : विविध वैशिष्ट्याने परिपूर्ण असलेला बारसू आणि गोवळचा पठार आज खऱ्या अर्थाने देशाचा आणि कोकणचा अभिमान म्हणून त्याचे संवर्धन होण्याची गरज आहे. गेली पंचवीस हजाराहून अधिक वर्षांचा कातळशिल्पांचा ठेवा कास पठारालाही मागे सारेल. त्यामुळे कोकणातील निसर्गाने दिलेले सौदर्य अनुभवण्यासाठी पावसाळ्यात या, असे गौरवोद्गार रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार व शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी बारसू गोवळ परिसरातील कातळशिल्पांच्या पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना काढले.

केंद्र सरकारने स्थापन केलेल्या कमिटीने आज मंगळवारी बारसू गोवळ परीसराचा दौरा केला. या पहाणी दौऱ्यात संशोधकांसह अभ्यासक मंडळी सहभागी झाली होती. सर्व प्रथम सर्वांनी बारसू परिसरातील कातळशिल्पांची पहाणी केली. प्रत्येक कातळशिल्पांची विविधता, त्यांची वैशिष्ट्ये, दिशादर्शकता पाहून आलेली संशोधक व अभ्यासक मंडळी हरवून गेली. तर खासदार विनायक राऊत यांनी कातळशिल्पांचा असलेला खजिना पाहून गौरवोद्गार काढले.

यावेळी राऊत म्हणाले, सुमारे पंचवीस हजार वर्षांपासुन बारसू गोवळच्या पठारावरील विविधांगी वैशिष्ट्यपूर्ण कातळशिल्पे ही खऱ्या अर्थाने कोकणसह देशाचा अभिमान असून याचे संवर्धन होणे गरजेचे आहे. निसर्गाने कोकणला भरभरुन दिले असल्याची ही पोचपावती आहे. सुमारे पंचवीस हजार वर्षांपुर्वीचा निसर्गाने दिलेला हा ठेवा कोकणच्या सौंदर्यात अधिक भर घालणारा आहेच, शिवाय भविष्यात कातळशिल्पांचा हा ठेवा कास पठारालादेखील मागे सारेल, त्यासाठी श्रावण महिन्यात देशभरातील निसर्गप्रेमींनी बारसूच्या पठारावर येऊन येथील कातळशिल्पांचा जास्तीत जास्त आनंद घ्यावा, असे आवाहन करत कातळशिल्पांची ही देन देशासह जगभरातील संशोधक,अभ्यासकांसाठी मोलाची ठरेल.असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. तसेच  केंद्र सरकारने गठीण केलेली अभ्यासक व संशोधकांची कमिटी कातळशिलांचे संवर्धनासाठी निश्चीतच योग्य भूमिका घेतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सर्वप्रथम खासदार विनायक राऊत यांनी बारसू गोवळ येथील कातळशिल्पांची पहाणी केली. त्यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना (ठाकरे गटाचे) जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख कमलाकर कदम, विधानसभा क्षेत्र सहसंपर्क प्रमुख चंद्रप्रकाश उर्फ बबन नकाशे, सेनेचे आजी माजी पदाधिकारी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या कमिटीतील सदस्य डॉ चव्हाण, श्रीमती मृदुला देसाई, जिग्ना देसाई, डॉ. प्रविणकुमार सुकुमारन, कातळशिल्पांचे अभ्यासक रिसबुड, धनंजय मराठे यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

                  हेही वाचलंत का ? 

Back to top button