चांदवड; पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील तळेगावरोही गावच्या शिवारात रात्रीच्या वेळी पाण्याच्या शोधात कोल्हा विहिरीत पडला. विहिरीत पडलेल्या कोल्हयाला वनविभागाच्या कर्मचारी व नागरिकांनी जाळीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर कोल्हयाने त्याच्या अधिवासात धूम ठोकली.
तालुक्यातील तळेगावरोही येथील राधाजी सावकार यांच्या शेतातील विहिरीत रात्रीच्या सुमारास पाण्याच्या शोधात असलेला कोल्हा पडला. शनिवार (दि.१०) रोजी विहिरीतून आवाज येत असल्याने सावकार यांनी विहिरीत पाहिले असता त्यांना कोल्हा विहिरीत पडल्याचे दिसले. त्यांनी लगेचच गावचे पोलीस पाटील अविनाश अहिरे यांना घटनेची माहिती दिली. पोलीस पाटील अहिरे यांनी येवला येथील वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय म्हात्रे यांना कळवले.
काही वेळात वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहचले. यावेळी विहिरीत जाळी सोडली. मात्र कोल्हा जाळीत येत नव्हता. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते भागवत झाल्टे यांनी विहिरीत उतरून कोल्हयाला जाळीकडे काठीच्या सहाय्याने ओढले. त्यानंतर कोल्हा जाळीत अडकला. त्यानंतर त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आला.
वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय मात्रे, वनरक्षक नवनाथ बिन्नर, वाहन चालक भूरक, वन मंजूर शिवाजी कदम, अंकुश गुंजाळ, बाळकृष्ण सोनवणे, भाऊसाहेब झाल्टे, पोलीस पाटील, अविनाश अहिरे, समाजसेवक भागवत झाल्टे आदींचे सहकार्य लाभले.
हेही वाचा