नाशिक : अखेर उपजिल्हाधिकाऱ्यांना पदस्थापना ; दाैंडे, हिले, आवळकंठे यांचा समावेश | पुढारी

नाशिक : अखेर उपजिल्हाधिकाऱ्यांना पदस्थापना ; दाैंडे, हिले, आवळकंठे यांचा समावेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

तहसीलदार संवर्गातून उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती झालेले आणि गेल्या महिनाभरापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांना अखेर शासनाने पदस्थापना केली. या अधिकाऱ्यांमध्ये नाशिकचे तत्कालीन तहसीलदार अनिल दाैंडे व येवल्याचे तहसीलदार प्रमोद हिले यांचा समावेश आहे.

शासनाने मे महिन्यात राज्यातील ५८ तहसीलदारांना उपजिल्हाधिकारीपदी बढती दिली. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये आनंद संचारला होता. महिनाभर उलटूनही पदस्थापना मिळत नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांचा आनंद अल्पकाळ ठरला. दरम्यानच्या काळात अधिकाऱ्यांनी मुंबईत मंत्रालयाच्या वाऱ्याही केल्या. सरतेशेवटी शासनाने सोमवारी पदस्थापनेचे आदेश काढले. त्यामध्ये पदोन्नतीने उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती मिळालेल्या ५८ ही अधिकाऱ्यांना नव्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे.

नाशिकचे तत्कालीन तहसीलदार तथा उपजिल्हाधिकारीपदी बढती मिळालेले अनिल दाैंडे यांची धाराशिव येथे जिल्हा पुनर्वसन अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. येवल्याचे तत्कालीन तहसीलदार प्रमोद हिले यांची चाळीसगाव प्रांतपदी नेमणूक झाली आहे. याशिवाय शिवकुमार आवळकंठे यांची नंदुरबार जिल्हा पुनर्वसन अधिकारीपदी व अर्चना खेतमाळीस यांची औरंगाबाद येथे रोहयो उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती शासनाने केली आहे. आवळकंठे व खेतमाळीस यांनी यापूर्वी तहसीलदार म्हणून नाशिक जिल्ह्यात काम केले आहे. दरम्यान, गेल्याच आठवड्यात नायब तहसीलदार पदावरून तहसीलदार म्हणून पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांच्या विभागनिहाय पदस्थापना शासनाने केल्या होेत्या.

खुर्चीसाठी जोरदार प्रयत्न

गेल्या महिन्यात बदल्यांवेळी तहसीलदार व उपजिल्हाधिकारी संवर्गातील काही अधिकाऱ्यांना अद्यापही पोस्टिंग मिळालेली नाही. अशातच शासनाने नियमित बदल्यांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांनी मनपसंत खुर्चीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहे.

हेही वाचा :

Back to top button