राज्यात आयटीआयच्या दीड लाख जागा, लवकरच राबविणार प्रवेश प्रक्रिया | पुढारी

राज्यात आयटीआयच्या दीड लाख जागा, लवकरच राबविणार प्रवेश प्रक्रिया

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर इयत्ता अकरावी तसेच इतर व्यवसाय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांसह पालकांची लगबग सुरू होते. इयत्ता अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी राज्यात आयटीआयच्या दीड लाख जागा उपलब्ध असणार आहेत.

राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजने अंतर्गत केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पद्धतीने व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून राबविण्यात येणार आहे. यंदा ४१८ शासकीय आणि ५७४ अशासकीय संस्थांमधील १ लाख ५४ हजार ३९२ जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत. त्यामध्ये शासकीय आयटीआयच्या ९५ हजार ३८० आणि खासगी आयटीआयच्या ५९ हजार १२ जागांचा समावेश आहे.

दरम्यान, नाशिक व पुणे येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर या व्यवसायाच्या प्रत्येकी दोन तुकड्यांना डीजीटी (नवी दिल्ली) यांच्याकडून संलग्नता प्राप्त होणे अपेक्षित असून, त्यातील प्रत्येकी एका तुकडीमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. तसेच अकोला (मुली), धुळे, पुणे (मुली), सांगली, नाशिक, जालना, अमरावती, नागपूर, मुलुंड, अंबरनाथ, गडचिरोली, घनसावंगी आदी १२ आयटीआयमधून ड्रोन टेक्निशियन या व्यवसायामध्ये नव्याने प्रवेशाला सुरुवात होणार आहे.

दोन नवीन कोर्सेस उपलब्ध

आयटीआयमध्ये यंदा प्रवेशासाठी ८३ अभ्यासक्रम उपलब्ध असणार आहेत. त्यामध्ये पारंपरिक इलेक्ट्रिशियन, फिटर, मेकॅनिक मोटर व्हेईकल, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग टेक्निशियन, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, वेल्डर यासारख्या लोकप्रिय व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश आहे. तसेच नव्याने सुरू होणाऱ्या एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर तसेच ड्रोन टेक्निशियन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या व्यवसायिक कोर्सेसला विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.

हेही वाचा :

Back to top button