चक्क आळिंबीलाही येतो घाम! | पुढारी

चक्क आळिंबीलाही येतो घाम!

न्यूयॉर्क : शरीराचे तापमान वाढले की आपल्याला घाम येतो व या माध्यमातून शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न शरीर करीत असते. मात्र, आळिंबी व अन्यही काही बुरशी प्रकारांमध्ये असाच प्रकार घडतो याची आपण कल्पना करणार नाही. आता एका नव्या संशोधनातून तसे घडत असल्याचे दिसून आले आहे. मशरूम म्हणजेच आळिंबी आणि बहुतेक सर्वच बुरशींमध्ये तापमान कमी करण्यासाठी पाणी बाहेर टाकण्याची क्षमता असते असे या संशोधनात आढळले.

बुरशीला थंड राहण्याची का आवश्यकता भासते हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, यामधून बुरशीच्या जीवशास्त्राच्या काही मूलभूत वैशिष्ट्यांवर नवा प्रकाश पडला असून त्यामधून मानवी आरोग्याबाबतही काही नव्या गोष्टी उलगडू शकतात. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीमधील डॉ. आर्टुरो कॅसाडेवाल यांनी सांगितले की आमच्यासाठी ही अत्यंत रंजक बाब होती. ही एक आजपर्यंत स्पष्ट न झालेली घटना होती.

जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीतीलच प्रमुख संशोधक रॅडॅमेस कॉर्डेरो यांनी झाडावर वाढलेल्या मशरूमची छायाचित्रे टिपण्यासाठी इन्फ्रारेड कॅमेर्‍यांचा वापर केला. इन्फ्रारेड कॅमेर्‍यांमध्ये फोटोतील प्रत्येक वस्तूच्या तापमानाचाही अंदाज करता येऊ शकतो. हे मशरूम आजुबाजूच्या वातावरणापेक्षा तुलनेने थंड असल्याचे दिसून आले.

प्रयोगशाळेतही काही प्रकारच्या आळिंबी वाढवून त्यांचे निरीक्षण करण्यात आले. त्यावेळी आळिंबी आजुबाजूच्या वातावरणापेक्षा स्वतःला थंड ठेवत होत्या असे दिसले. अगदी अंटार्क्टिकासारख्या थंड खंडात आढळणार्‍या ‘क्रायोमिकेस अंटार्क्टिकस’ या आळिंबीतही हाच प्रकार दिसला हे विशेष! या आळिंबी त्यांच्या पृष्ठभागावरून पाण्याचे बाष्पीभवन करून स्वतःला थंड ठेवतात असे दिसून आले. याचा अर्थ एक प्रकारे त्यांनाही घाम येतो व त्या स्वतःला या मार्गाने थंड ठेवतात!

Back to top button