नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मनपा शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी सुनीता सुभाष धनगर या वैद्यकीय कारणास्तव जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी ताटकळत होत्या. धनगर या जिल्हा रुग्णालयात सायंकाळी आराेग्य तपासणीसाठी अपघात विभाग ते अतिदक्षता विभाग अशा फेऱ्या मारत होत्या. रात्री ८ पर्यंत त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत ताटकळत होत्या.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासणीत धनगर यांच्या बँक खात्यांमध्ये ३० लाख रुपये आढळून आले आहेत. धनगर यांना शुक्रवारी (दि. २) महापालिकेच्या शिक्षण विभागात ५५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात धनगरांसह लिपिकाविरोधात गुन्हा दाखल आहे. धनगर यांच्या घरझडतीत ८५ लाख रुपये रोख व ३२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आढळले. न्यायालयाने या दोन्ही लाचखोरांना सोमवार (दि.५)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. मात्र, सुट्टी असल्याने तपासात अपेक्षित गती मिळाली नसल्याची चर्चा होती. सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने धनगर यांच्या कोठडीत मंगळवारपर्यंत एक दिवसाची वाढ केली. त्यानंतर त्या नियमित तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आल्या असता त्यांनी आरोग्य तक्रार केली. सायंकाळी पाचपासून त्या रुग्णालयात फिरताना दिसल्या. मात्र, फिजिशियन नसल्याने त्यांची तपासणी होत नव्हती. रात्री आठपर्यंत हा प्रकार सुरू होता. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागास तपासात अडथळा आल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा :