नाशिक : सांदण व्हॅली पावसाळ्यात बंद राहणार, वन्यजीव विभागाचा निर्णय | पुढारी

नाशिक : सांदण व्हॅली पावसाळ्यात बंद राहणार, वन्यजीव विभागाचा निर्णय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कळसुबाई- हरिश्चंद्रगड अभयारण्यातील निसर्गाच्या कुशीत असलेल्या साम्रद गावाच्या शिवारातील सांदण व्हॅलीत पर्यटकांची नेहमीच मांदियाळी असते. मात्र, रविवारी (दि. ४) या व्हॅलीत अचानक पाण्याची पातळी वाढल्याने सुमारे ५०० पर्यटक अडकले होते. वनकर्मचारी व ग्रामस्थांच्या मदतीने पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सांदण व्हॅली पावसाळ्यात बंद ठेवण्याचा निर्णय वन्यजीव विभागाने घेतला आहे.

सांदण व्हॅली परिरात वीकेण्डला पर्यटनस्थळी मोठी गर्दी होते. निसर्ग आविष्कार पाहण्यासाठी पर्यटकांची भंडारदरा धरण, खोडाळा, सुंदरनारायण गणेश मंद‌िर याशिवाय कुलंग, अलंग, मदनगड, कळसूबाई, रतनगड या उत्तुंग डोंगररांगा, तसेच सांदण दरी, रंधा धबधबा या ठिकाणी झुंबड उडते. या परिसरातील धबधबे पावसाळ्यात पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असतात. काही हौशी पर्यटकांमुळे पर्यटनस्थळी दुर्घटना घडण्याची शक्यता असते.

आशिया खंडातील सर्वांत खोल दऱ्यांमध्ये सांदण व्हॅलीचा दुसरा क्रमांक लागतो. म्हणूनच ती पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. पावसाळ्यात पावसाचे पाणी याच व्हॅलीतून जाेरदार कोळसते. त्यामुळे दरवर्षी या व्हॅलीत जाण्यास वन्यजीव विभागाकडून पर्यटकांना मज्जाव केला जातो. यंदाही तोच निर्णय वन्यजीव विभागाने घेतला आहे. त्यामुळे पावसाळा संपेपर्यंत सांदण व्हॅलीत पर्यटकांना नो एन्ट्री असणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात सांदण व्हॅली पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. रविवार (दि. ४)च्या घटनेनंतर ग्रामस्थांची तत्काळ बैठक घेण्यात आली असून, पावसाळा सुरू होईपर्यंत व्हॅलीत जाण्यासाठी मुभा असणार आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी रेस्क्यू टीम आणि ग्रामस्थांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

– गणेश रणदिवे, सहाय्यक वनसंरक्षक कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य

आठवडाभरच मिळणार प्रवेश

मान्सूनपूर्व पाऊस सर्वत्र बरसत आहे. तसेच काजव्यांचे आकर्षणही पर्यटकांना आहे. त्यामुळे सांदण व्हॅलीत पर्यटकांची झुंबड उडते. मान्सूनच्या सरी बरसायला लागल्यानंतर पर्यटकांना मनाई करण्यात येणार आहे. तोपर्यंत अर्थात येता आठवडाभरच पर्यटकांना व्हॅलीत प्रवेश मिळणार आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर व्हॅली पर्यटकांसाठी बंद राहणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button