नाशिक : जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सिंधी समाज आक्रमक

नाशिक : जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सिंधी समाज आक्रमक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सिंधी समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ नाशिकमधील सिंधी बांधव सोमवारी (दि.५) रस्त्यावर उतरले. सिंधी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आ. आव्हाड यांच्यावर कारवाई करण्याचे निवेदन प्रशासनाला दिले.

उल्हासनगर येथे २७ मे रोजी एका कार्यक्रमात आव्हाड यांनी सिंधी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून राज्यभरातील सिंधी समाजामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. नाशिक शहरातील बांधवांनी मोर्चा काढत आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात देशाच्या फाळणीच्या काळात सिंधी समाजाने अतिशय वेदना सहन केल्या. देशाच्या फाळणीनंतर भारताच्या वेगवेगळ्या भागात सिंधी समाज स्थलांतरित झाला. देशाच्या आजच्या आर्थिक जडणघडणीत समाजाचा सिंहाचा वाटा आहे. आमचा समाज हा शांतताप्रिय व देशाच्या विकासात सहभागी होणारा समाज म्हणून ओळखला जातो. मात्र, धर्मनिरपेक्ष पक्षाचे नेते असणाऱ्या आव्हाड यांनी सिंधी समाजाबद्दल अवमानकारक वक्तव्य केले आहे. एका विशिष्ट समाजाला खूश करण्यासाठी जाणूनबुजून त्यांनी हे वक्तव्य केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. माजी मंत्री व एका पक्षाचे जबाबदार व्यक्ती असताना पदाचे कुठलेही भान न ठेवता समाजात तेढ निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी आव्हाड यांनी बेताल वक्तव्य केले. त्यामुळे आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक होईपर्यंत लोकशाही मार्गाने वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही सिंधी बांधवांनी दिला.

शालिमार येथील देवी मंदिरापासून प्रारंभ झालेला माेर्चा शिवाजी राेडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळामार्गे सीबीएस तेथून छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे समारोप झाला. माेर्चात मोठ्या संख्येने सिंधी बांधव सहभागी झाले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news