नाशिककरांना मान्सूनपूर्व सरींचा दिलासा | पुढारी

नाशिककरांना मान्सूनपूर्व सरींचा दिलासा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने हैराण झालेल्या नाशिककरांना रविवारी (दि. 4) मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी दिलासा दिला. अचानक आलेल्या या पावसाने हवेत गारवा निर्माण होऊन सामान्यांची उकाड्यातून सुटका झाली. जिल्ह्यात इतरत्र मनमाड, त्र्यंबकेश्वर, सिन्नर आणि वणीत वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावल्याने स्थानिकांचे हाल झाले.

गेल्या पंधरवड्यापासून नाशिकमधील तापमानाच्या पाऱ्यात चढ-उतार होेत आहे. पारा थेट ४० अंशांपलीकडे जाऊन पाेहोचल्याने सर्वसामान्य हैराण झाले होते. मात्र, शहर व परिसरात रविवारी (दि. 4) सकाळपासून ढगाळ हवामान तयार झाले. त्यातच सकाळी 11.30 च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. अवघ्या १५ ते २० मिनिटे पडलेल्या पावसाने हवेतील उष्मा कमी होण्यास मदत मिळाली खरी. परंतु, अचानक आलेल्या पावसाच्या सरींमुळे शहरातील मेनरोड, रविवार कारंजा व अन्य भागांतून रस्त्यांवरून पाणी वाहात होते. परिणामी छोट्या-मोठ्या विक्रेत्यांचे हाल झाले. तर सुटीचा मुहूर्त साधत शालेय खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची धावपळ झाली.

मान्सूनपूर्वच्या पहिल्याच पावसात शहरातील स्मार्ट सिटी व गॅस पाइपलाइनसाठी खोदलेल्या रस्त्यांची दुरवस्था झाली. अनेक ठिकाणी रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचले होते. तसेच रस्ते बुजविण्यासाठी महापालिकेकडून मुरूम व खडींचा वापर केल्याने पहिल्या पावसात ठिकठिकाणी पाणी साचण्यासह चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. परिणामी या रस्त्यांवरून वाहने नेताना चालकांची दमछाक झाली. दरम्यान, शहरात २ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही ठिकठिकाणी मान्सूनपूर्व सरी बरसल्या. मनमाड शहर व परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मनमाडवासीयांची त्रेधातिरपीट उडाली. दुसरीकडे वणी शहरात झालेल्या पावसामुळे पावसाळी गटाराच्या कामांचे पितळ उघडे पडले. सिन्नर तालुक्यातही जोरदार पावसामुळे काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या असून, कोमलवाडी येथील व्यायामशाळेचे पत्रे तसेच फ्लेक्सही वाऱ्याने उडून गेले. त्र्यंबकेश्वर तालुक्यालाही पावसाने दीड तास झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची धावपळ उडाली असली, तरी हवेत गारवा निर्माण झाल्याने सर्वसामान्यांची उकाड्यापासून सुटका झाली.

Back to top button