मुंबईत एकत्र लढण्याचा राष्ट्रवादीचा ठाकरेंना प्रस्ताव; अजित पवार यांची माहिती | पुढारी

मुंबईत एकत्र लढण्याचा राष्ट्रवादीचा ठाकरेंना प्रस्ताव; अजित पवार यांची माहिती

नागपूर; पुढारी वृत्तसेवा :  मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढण्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांना दिल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नागपूर येथे रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली. या प्रस्तावावर आपण विचार करू, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

जनतेने मुंबईत शिवसेनेला आधी कौल दिला, त्यानंतर शिवसेनेचा कोकणसह सर्वत्र विस्तार झाला. आतादेखील वातावरण पाहिले तर निश्चितपणे जनतेमध्ये उद्धव ठाकरेंविषयी सहानुभूती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसे- नेला महापालिका निवडणुकीत चांगले यश मिळेल, असे सांगून अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादी मुंबई शहरात खूप काही ताकदवान नाही. त्यामुळे एकत्र लढल्याने महाविकास आघाडीचा फायदा होऊ शकतो. प्रचंड मोठ्या अर्थसंकल्पामुळे मुंबईवर डोळा असल्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत येऊन गेले आहेत. मी काल, आज आणि उद्यादेखील राष्ट्रवादीतच राहणार आहे. माझी भूमिका मी स्पष्ट करतो. इतरांनी वकीलपत्र घेण्याची गरज नाही असे सांगत भरत गोगावले यांच्यासह इतरांना गांभीर्याने घेऊ नका, असेही बजावले. यापुढे कोणाच्याही बातम्यांवर विश्वस ठेवू नका.

नाना पटोले यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबतच्या बॅनरविषयी छेडले असता पवार म्हणाले, कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत असतो मग असे होत असते, शिंदे गटाचे ४० आणि भाजपचे १०५ असे गद्दारी करून १४५ आकडा गाठल्याने ते मुख्यमंत्री झाले शेवटी आकडा महत्त्वाचा असतो. ज्याचे जास्त आमदार त्याचे मुख्यमंत्री होतात. अपवाद फक्त २००४ चा. त्यावेळी काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीच्या जागा अधिक निवडून आल्या होत्या. पण अधिक मंत्रिपदाच्या तडजोडीत काँग्रेसला राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपद दिले होते. याची आठवण यावेळी अजित पवार यांनी करून दिली.

अॅड. प्रकाश आंबेडकर यांची मते आमच्याबद्दल अशीच असतात, त्यांनी काय करावे हा त्यांचा अधिकार आहे, आमच्या पक्षाबद्दल त्यांचे वेगळे मत आहे, प्रयत्न करत राहणे आमचे काम आहे, उद्धव ठाकरे यांना म्हटले, जमत असेल तर तुम्ही जमवून घ्या. सध्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने चाचपणी सुरू आहे. कार्यकर्त्यांचा अंदाज घेत असून नवीन चेहरे लक्षात घेत आहोत. भविष्यात जे उत्तम काम करतील त्यांचा आमदारकीसाठी विचार करू असे अजितदादांनी स्पष्ट केले.

Back to top button