नाशिक : आईच्या दुर्देवी मृत्यूमुळे चिमुकली झाली पोरकी | पुढारी

नाशिक : आईच्या दुर्देवी मृत्यूमुळे चिमुकली झाली पोरकी

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील पांगरी येथील कॉम्प्युटर इंजिनिअर असलेल्या महिलेचा बाळंतपणानंतर अवघ्या 17 दिवसांत मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.26) घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुणे येथे नोकरीला असलेल्या शुभांगी अविनाश निरगुडे (28) यांना नुकतेच कन्यारत्न झाले होते. मात्र, झोपेत आलेल्या ब्रेन स्ट्रोकने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पांगरी येथील रमेश रंगनाथ निरगुडे यांचा मुलगा अविनाश हा मॅकेनिकल इंजिनिअर असून, तो पुणे येथे नोकरीला आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह चोंंढी येथील शेतकरी भास्कर सोनवणे यांची मुलगी शुभांगी यांच्याशी झाला होता. शुभांगी व अविनाश दोघेही इंजिनिअर असल्याने पुणे येथे नोकरीला होते. 9 मे रोजी शुभांगी व अविनाश यांना कन्यारत्न प्राप्त झाले. बाळंतपणानंतर बाळ व आई दोघेही सुखरूप होते. पाचव्या दिवशी त्यांना पुण्यातील घरी आणले गेले. बाळाच्या पाचवी पूजनासाठी माहेर व सासरच्या मंडळींनी हजेरी लावली होती. त्यानंतर दुसर्‍या दिवशी शुंभागी नवजात मुलींसह झोपलेली होती. बाळ रडत असल्याने परिवारातील सदस्यांना जाग आली असता त्यांना शुभांगी बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. त्यांच्या तोंडातून फेस येत होता. नातेवाइकांनी त्यांना उपचारासाठी तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले, यावेळी डॉक्टरांनी शुभांगी यांना झोपेत ब्रेन स्ट्रोक बसल्याचे सांगितले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, उपचारादरम्यान शुभांगी यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा:

Back to top button