नाशिक : जनावरांचे दूध वाढविण्यासाठी ऑक्सिटोसीनचा साठा बाळगणारा गजाआड | पुढारी

नाशिक : जनावरांचे दूध वाढविण्यासाठी ऑक्सिटोसीनचा साठा बाळगणारा गजाआड

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
जनावरांचे दूध वाढविण्यासाठी बेकायदेशीरपणे ऑक्सिटोसीन औषधाचा साठा विक्रीसाठी बाळगणार्‍याला किल्ला पोलिसांनी अटक केली आहे. 60 हजार रुपयांची औषधी जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक दुधाची विक्री होत असल्याची बाब समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

मालेगावात समाजस्वास्थ्यासाठी धोकादायक ठरत असलेल्या कुत्तागोलीपाठोपाठ आत नागरी आरोग्याला हानिकारक ठरणार्‍या ऑक्सिटोसीन औषधाच्या वापराने तयार होणार्‍या दुधाचे आव्हान उभे ठाकले आहे. हिरापुरा हायफाय हॉटेलच्या पुढील मोकळ्या मैदानाजवळील पत्र्याच्या खोलीत पोलिसांनी मंगळवारी (दि.30) छापा टाकला. त्याठिकाणी ऑक्सिटोसीनच्या 100 मिली मापाच्या एक हजार बाटल्यांनी भरलेले पाच बॉक्स मिळून आले. संशयित आरोपी मो. अन्वर मो. एकबाल (51, रा. मोतीपुरा, शनिवार वार्ड) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक प्रशांत ब्राह्मणकर यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गाय, म्हशीचे दूध वाढविण्यासाठी अवैधरित्या ऑक्सिटोसीनचा वापर होतो. त्याच्या सेवनानेही आरोग्यावर विपरित परिणाम होतो. श्रवण, दृष्टीदोष, पोटाचे आजार, नवजात बालकाला काविळ, गरोदर स्त्रीचा अनैसर्गिक गर्भपात, श्वसनाचे व त्वचेचे आजार आदी गंभीर रोग होण्याची शक्यता असते. प्रसुतीसुरळित होण्यासाठीदेखील या औषधाचा वापर होत असला तरी त्यासाठी वैद्यकीय अधिकार्‍याची देखरेख आवश्यक असते. तेव्हा हा साठा कशासाठी केला होता, याचा तपास क्रमप्राप्त ठरतो. पोलिस उपनिरीक्षक एन. पी. महाजन हे तपास करीत आहेत.

हेही वाचा:

Back to top button