JDCC : जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेत राष्ट्रवादीचे आणखी तीन उमेदवार बिनविरोध | पुढारी

JDCC : जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेत राष्ट्रवादीचे आणखी तीन उमेदवार बिनविरोध

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : JDCC Bank : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आरोप पत्यारोप होत असताना छाननी पूर्वीच अर्ज दाखलच न झाल्याने शिवसेनेचे दोन तर राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे एक असे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. तर यानंतर छाननीत अर्ज अवैध ठरल्याने राष्ट्रवादीचे अजून तीन उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ( JDCC Bank ) निवडणुकीसाठी सोमवार दिनांक १८ ऑक्टोबर पर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतीम मुदत होती.  धरणगाव प्राथमिक सहकारी सोसायटी मतदारसंघातून  संजय मुरलीधर पवार  तर, याच प्रमाणे पारोळ्यातून आमदार चिमणराव पाटील तर एरंडोलमधून त्यांचे चिरंजीव अमोल चिमणराव पाटील यांची देखील बिनविरोध निवड निश्‍चीत झाली आहे. याबाबत अधिकृत घोषणा नंतर करण्यात येणार असली तरी महाविकास आघाडीच्या तीन जागा बिनविरोध आल्याने भाजपला धक्का बसला होता.

दरम्यान, यानंतर बुधवार दिनांक २० रोजी छाननी करण्यात आली. यात अनेक उमेदवारांच्या अर्जांवर आक्षेप घेण्यात आले होते. यात काही ठिकाणच्या उमेदवारांचे अर्ज बाद ठरले. यात अमळनेरमधून माजी आमदार स्मिता वाघ यांचा अर्ज बाद झाला. याच प्रमाणे मुक्ताईनगर आणि बोदवड येथील उमेदवारांचे अर्ज देखील बाद झाले. यामुळे सोसायटी मतदारसंघातून अमळनेर येथून आमदार अनिल भाईदास पाटील तर बोदवडमधून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांची बिनविरोध निवड निश्‍चीत झाली आहे.

मुक्ताईनगरात फक्त एकनाथराव खडसे आणि त्यांची कन्या रोहिणीताई खडसे यांचेच अर्ज आहेत. यात रोहिणी खडसे अर्ज मागे घेऊन त्या महिला वर्गवारीतून निवडणूक लढविणार आहेत. यामुळे नाथाभाऊंचा विजय देखील निश्‍चीत झाला आहे. दरम्यान, भुसावळ सोसायटी मतदारसंघातून माजी आमदार संतोष चौधरी यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरला असून तेथून नगराध्यक्ष रमण भोळे हे आमदार संजय सावकारे यांच्या विरोधात रिंगणात राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Back to top button