नाशिक : पार्टटाइम जॉब मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणाला ३४ लाखांचा गंडा | पुढारी

नाशिक : पार्टटाइम जॉब मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणाला ३४ लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पार्टटाइम जॉब देण्याच्या बहाण्याने शहरातील एका ३३ वर्षीय तरुणाची तब्बल ३४ लाखांची ऑनलाइन फसवणूक केली आहे. सायबर भामटे वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून नागरिकांना गंडा घालत असून, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

सातपूर येथील धनंजय कोल्हे यांना पार्टटाइम जाॅब करा आणि लाखाे रुपये मिळवा, अशी ऑफर संशयितांनी दिली होती. संशयितांनी त्यांना टेलिग्राम व व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून वारंवार संपर्क करून पैशांचे आमिष दाखविले. पार्टटाइम जाॅब हा काही तासांसाठी करावा लागेल, तुम्ही तुमचा आधारकार्ड व पॅनकार्ड लिंक असलेला माेबाइल नंबर द्या, त्यावर नाेंदणी करून तुम्हाला परतावा बँक खात्यात पाठविला जाईल, असे सांगितले. त्यासाठी त्यांना काम करण्याचा टास्क दिला. त्यात वारंवार पैसे क्रेडिट हाेताना दिसत असताना केल्हे यांनी आधी काही रक्कम संशयितांनी सांगितलेल्या खात्यांत भरली. २८ मार्च ते १२ एप्रिल २०२३ या कालावधीत कोल्हे यांनी एकूण ३३ लाख ८५ हजार रुपये भरले. मात्र, त्यांना पाहिजे तेवढा परतावा मिळालाच नसल्याचे समजले. विशेष म्हणजे आपलेच ३३ लाख रुपये घेऊन फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

या प्रकरणी नाशिक सायबर पाेलिसांत टेलिग्राम आयडी Nita00008 व Lal10086 धारक आणि 7023967624 चे व्हॉट्सॲप वापरकर्ता, फसवणुकीची रक्कम ज्या खात्यांवर जमा झाली त्या बँक खातेधारकांवर गुन्हा नाेंदविला आहे. दरम्यान, नागरिकांनी अशा कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा :

Back to top button