बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी सोमवारपासून अर्ज | पुढारी

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी सोमवारपासून अर्ज

पुणे; पुढारी वृत्तसेवा : बारावीच्या परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थी आणि श्रेणी सुधार करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठीचा प्रवेश अर्ज विद्यार्थ्यांना 29 मे ते 9 जूनदरम्यान नियमित शुल्कासह, तर 10 जून ते 14 जूनदरम्यान विलंब शुल्कासह शाळा-कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरता येणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.

विद्यार्थ्यांनी 29 मे ते 14 जून या कालावधीत अर्ज भरल्यानंतर 1 ते 15 जून या कालावधीत शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांना चलनाद्वारे बँकेत शुल्क भरायचे आहे. तर 16 जूनला शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या विभागीय मंडळात जमा करायच्या आहेत. ऑनलाईन अर्जात मार्च-एप्रिल 2023 मध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांची त्या परीक्षेतील माहिती प्रवेश अर्जात घेता येईल.

विद्यार्थ्यांचे समुपदेशन…

मंडळाने बारावीच्या परीक्षेवेळी विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन सेवा सुरू केली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर दडपणाखाली असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन समुपदेशन सेवा आहे. हे समुपदेशन निकालानंतर आठ दिवस सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत विनाशुल्क करण्यात येईल. समुपदेशकांचे भ—मणध्वनी मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

Back to top button