नाशिक : महासभेने फटाके बंदीविरोधातील निर्णय फेटाळला | पुढारी

नाशिक : महासभेने फटाके बंदीविरोधातील निर्णय फेटाळला

नाशिक; पुढारी वृत्तसेवा: मनपा प्रशासनाने नाशिकमध्ये फटाके बंदीसंदर्भात सादर केलेला प्रस्ताव महासभेने एकमताने फेटाळून लावला. यामुळे दिवाळीमध्ये फटाक्यांची आतषबाजी आणि बार उडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फटाके बंदीबाबत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मनपा प्रशासनाला पत्र सादर करत ठराव करण्याचे आदेश दिले होते.

महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.२०) रोजी महासभा पार पडली. या महासभेत मनपा प्रशासनाने विभागीय आयुक्तांच्या पत्राच्या आधारे फटाके विक्री व वापर यावर बंदी करण्याबाबतचा प्रस्ताव महासभेवर मंजुरीसाठी सादर केला होता. त्यास सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमताने विरोध करत हा विषय नामंजूर करण्याची मागणी महापौरांकडे केली.

त्यानुसार महापौर कुलकर्णी यांनी देखील नागरिकांच्या भावनांचा विचार करत तसेच विक्रेत्यांचे होणारे आर्थिक नुकसान पाहता संबंधित विषय नामंजूर करण्यात येत असल्याचे सांगत फेटाळून लावला. यामुळे नाशिक शहरात दिवाळीनिमित्त फटाके वाजविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

माझी वसुंधरा अभियानअंतर्गत हवेची गुणवत्ता राखली जावी यासाठी मनपाला पत्र पाठवून फटाके विक्री तसेच वापरास बंदी आणण्यासाठी महासभेत ठराव करून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले होते. या पत्रानंतर महासभेने प्रस्ताव फेटाळून लावला.

याच दरम्यान नागरिक, व्यावसायिक आणि विक्रेत्यांनी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांच्याकडे संबंधित निर्णय मागे घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार छगन भुजबळ यांनी या मागणीची दखल घेत विभागीय आयुक्तांना सूचना दिल्या आणि यामुळे विभागीय आयुक्तांनी देखील संबंधित निर्णय मागे घेत परवानगी दिली.

हेही वाचलंत का?

दिवाळी तोंडावर आली असताना अशा प्रकारे बंदी आणणे उचित नाही. तसेच लोकांच्या भावनाचा विचार करता आणि विक्रेत्यांनी फटाके विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केलेली गुंतवणूक लक्षात घेऊन प्रशासनाने सादर केलेला प्रस्ताव एकमताने नामंजूर केला आहे.
– सतीश कुलकर्णी, महापौर

Back to top button