नाशिकमधील नाट्यगृहांना चहाचे वावडे..! | पुढारी

नाशिकमधील नाट्यगृहांना चहाचे वावडे..!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाकवी कालिदास कलामंदिर येथे डॉ. सलील कुलकर्णी व संदीप खरे यांचा ‘आयुष्यावर बोलू काही’ कार्यक्रम, तर परशुराम साईखेडकर नाट्यगृहात बाबाज थिएटर्सचा रोमॅण्टिक हिटस गाण्यांच्या कार्यक्रम (दि.२१) सायंकाळच्या वेळी आयोजित करण्यात आला होता. या दोन्ही ठिकाणी येणाऱ्या प्रेक्षकांना नाट्यगृहाच्या आवारात साधा कपभर चहा मिळत नसल्याने प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला.

सार्वजनिक वाचनालयाच्या परशुराम साईखेडकर नाट्यगृहालगत सहा महिन्यांपूर्वी कॅण्टीन सुरू करण्यात आले होते. शिवाय हे कंत्राट सावानातील व्यवस्थापिकांच्या पतीला देण्यात आले आहे. इथे सुरुवातीला चहा मिळत होता. येणारे प्रेक्षक चहाचा घोट घेत गप्पागोष्टी करत; पण गेल्या काही महिन्यांपासून कॅण्टीनमध्ये चहा बनवणारा माणूस निघून गेल्यानंतर आजवर त्यांना चहा बनवणारा माणूसच न मिळाल्याने येणाऱ्या प्रेक्षकांना कपभर चहाही मिळत नाही. कालिदास कलामंदिर येथे मध्यांतरात चहा पिण्यासाठी बाहेर पडावे लागते. पण, बाहेरची चहाची टपरी बंद असल्यावर मात्र त्यांचे हाल होतात. असा प्रकार वरचेवर होत असतो. चहा ही प्रत्येक माणसाची प्राथमिक गरज असते. शहराचे तापमान कितीही तापलेले असले तरी भारतीय माणूस चहा पिण्याला महत्त्व देतो. अशात कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना कपभर चहाही मिळेना हे दुर्दैव.

दर महिन्याच्या १ तारखेला पसामध्ये कार्यक्रम घेत असतो. प्रेक्षक माझ्याकडे विनंतीवजा तक्रार करतात. निदान चहा, कॉफी तरी मिळावी. चहा आम्हाला परवडत नाही, चहाला खर्च खूप येतो अशी उत्तरे कॅण्टीन चालकाकडून मिळतात. – प्रशांत जुन्नरे, आयोजक बाबाज थिएटर्स

कोणत्याही नाट्यगृहात प्रेक्षकांना चहा, कोल्ड्रिंक मिळणे गरजेचे असते. कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक, मधुमेही रुग्ण येतात त्यांनाही बिनासाखरेचा चहा मिळणे गरजेचे आहे. – मुकुंद कुलकर्णी अध्यक्ष, लोकहितवादी मंडळ

कधीतरी कुटुंबासोबत नाटकाच्या प्रयोगाला गेलो तर कुठे एसी बंद, खुर्च्या मोडलेल्या, प्रसाधनगृहांची दुरवस्था यामुळे प्रेक्षक मॉल्स, मल्टिप्लेक्सला अधिक प्राधान्य देतात. – स्वप्निल कांबळे, प्रेक्षक

हेही वाचा:

Back to top button