Ashadhi Wari : वारीतील हॉटेलांवर राहणार ‘वॉच’ | पुढारी

Ashadhi Wari : वारीतील हॉटेलांवर राहणार ‘वॉच’

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुढील महिन्यात होणार्‍या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान वारकर्‍यांची प्रशासनाकडून काळजी घेतली जाणार आहे. आरोग्य उत्तम राहण्यासाठी पालखी मार्गावरील हॉटेलांवर जिल्हा प्रशासनाची नजर असणार आहे. हॉटेलची काटेकोर तपासणी केली जाणार असून, मार्गावरील वैद्यकीय अधिकार्‍यांना जिल्हा परिषदेने याबाबत सूचना दिल्या आहेत.

जून महिन्यामध्ये पालखी सोहळा सुरू होणार आहे. पालखी सोहळ्यापूर्वी जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्याबाबत नियोजन सुरू आहे. जिल्ह्यातून दोन्ही सोहळे मार्गक्रमण करताना वारकर्‍यांना योग्य आहार मिळावा, यासाठी ही हॉटेल तपासणी करण्यात येणार आहे.

मार्गावरील हॉटेल, ढाबे, उपाहारगृहे, चहा टपरी आणि इतर खाद्यपदार्थ विक्रेते यांना आरोग्यविषयक योग्य ती दक्षता घेण्याबाबत सूचना करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पथकामार्फत वेळोवेळी पालखी मार्गावरील हॉटेलची तपासणी करून स्वच्छतेची पाहणी करण्यात येणार आहे. शिळे, उघडे अन्नपदार्थ, नासलेली फळे विकण्यास मनाई करण्यात येणार आहे. याशिवाय, सर्व हॉटेल कामगारांची आरोग्य तपासणीदेखील करण्यात येणार आहे. आरोग्य तपासणी, हॉटेलची तपासणी झाल्यानंतर आरोग्य अधिकार्‍यांकडून हॉटेलचालकांना कार्ड देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली.

Back to top button